India Womens vs England Womens: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारताने विजयाची नोंद केली होती. मात्र त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हिथर नाईटने शतकी खेळी केली. तर एमी जोन्सने दमदार अर्धशतक झळकावलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या महिला संघाने ५० षटकांअखेर ८ गडी बार २८८ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पूर्ण जोर लावला. भारतीय फलंदाजांनी या सामन्यावर पकड मजबूत केली होती. पण शेवटच्या षटकांमध्ये भारतीय संघाच्या हातून सामना निसटला. दरम्यान भारतीय संघाकडून नेमकी काय चूक झाली? सामना गमावण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने वक्तव्य केलं आहे.

या सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत कौरने, स्म्रिती मान्धाना बाद होणं या सामन्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं म्हटलं आहे. हरमनप्रीत कौर म्हणाली, “स्म्रिती बाद होणं हा आमच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. आमच्याकडे फलंदाज होते, पण सामना आमच्या हातून कसा निसटला हेच कळत नाही. इंग्लंडला श्रेय द्यावं लागेल. त्यांनी शेवटपर्यंत जोर लावला. त्यांना गोलंदाजी करताना विकेट्स घेण्यात यश मिळालं. खूप वाईट वाटतं जेव्हा इतकी मेहनत केल्यानंतर शेवटच्या ५-६ षटकात आपण ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही. हा खूप हृदयद्रावक क्षण आहे.” असं हरमनप्रीत कौर सामन्यानंतर बोलताना म्हणाली.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २८९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ६ गडी बाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या प्रतिका रावलने ६ धावांची खेळी केली. तर स्म्रिती मान्धनाने ८८ धावांची दमदार खेळी केली. स्म्रिती फलंदाजी करत असताना भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हरलीन देओलने २४ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ७० धावांची खेळी केली. तर दिप्ती शर्माने ५० धावांची खेळी केली. शेवटी अमनजोत कौर १८ आणि स्नेह राणा १० धावांवर नाबाद राहिली. पण भारतीय संघाला हा सामना ४ धावांनी गमवावा लागला.