सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत असल्याने त्यांना लय, तसेच तंदुरुस्ती राखण्यासाठी सातत्याने सामने कसे द्यायचे हा भारतीय संघासमोरील मोठा प्रश्न आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतरच शोधले जाऊ शकते, असे वक्तव्य भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने केले.
रोहित आणि कोहली यांनी अनुक्रमे नाबाद १२१ आणि नाबाद ७४ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची दमदार सांगता केली. भारताने ही मालिका गमावली, पण ‘रो-को’च्या कामगिरीमुळे भारताला किमान अखेरचा सामना जिंकता आला. आता हे दोघे थेट ३० नोव्हेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील.
दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्यान सात आठवड्यांचा कालावधी असणार आहे. या काळात रोहित आणि कोहलीला लय, तसेच तंदुरुस्ती राखता यावी यासाठी काय नियोजन असेल, असे विचारले असता, ‘‘आम्ही याबाबत अद्याप चर्चा केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची मालिका संपल्यानंतर (६ डिसेंबर) आम्हाला काही आठवडे विश्रांती मिळणार आहे. त्यानंतर आम्ही न्यूझीलंडविरुद्ध पुढील वर्षीच्या सुरुवातीला एकदिवसीय मालिका खेळू. या दरम्यान खेळाडूंना सामने कसे खेळवता येतील हे आम्हाला पाहावे लागेल. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतरच आम्ही काय तो निर्णय घेऊ,’’ असे गिलने सांगितले.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनुक्रमे ३० नोव्हेंबर, तसेच ३ आणि ६ डिसेंबरला एकदिवसीय सामने खेळेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला ११ जानेवारी २०२६ पासून सुरुवात होईल. त्यामुळे रोहित आणि कोहलीसाठी लय राखणे आव्हानात्मक ठरू शकेल. त्यांच्यासमोर विजय हजारे करंडक देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याचा पर्याय आहे. ही स्पर्धा २४ डिसेंबरपासून रंगणार आहे.
‘सामने जिंकवणारे खेळाडू’
रोहित आणि विराटभाई गेल्या १५ वर्षांपासून देशाला सामने जिंकवत आहेत. त्यांच्यासारखे खेळाडू लयीत असतात, तेव्हा त्यांचा खेळ पाहताना वेगळीच मजा येते, असे गिल म्हणाला. ‘‘या दोघांची गुणवत्ता आणि क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे. कर्णधार म्हणून पॅव्हेलियनमध्ये बसून त्यांना अशा प्रकारे खेळताना पाहणे हा वेगळाच अनुभव आहे. त्यांनी चेंडू टोलावल्यानंतर जो आवाज येतो, तोच ते किती उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत हे सांगून जातो. दोन सर्वांत अनुभवी खेळाडूंनी नाबाद राहून संघाला सामना जिंकवून दिला, हे आमच्यासाठी समाधान देणारे होते,’’ असेही सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर गिलने नमूद केले. रोहित आणि कोहलीने या सामन्यात १६८ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
आठव्या क्रमांकासाठी हर्षित दावेदार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही फलंदाजीत योगदान देऊ शकेल अशा वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहोत. हर्षित राणा यासाठी मुख्य दावेदार म्हणून पुढे येऊ शकतो, असे गिल म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात हर्षितने नाबाद २४ धावा फटकावल्या, मग तिसऱ्या सामन्यात गोलंदाजीत चार बळी मिळवले. ‘‘आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या क्रमांकावरील फलंदाजाच्या २०-२५ धावाही निर्णायक ठरू शकतात. हर्षितमध्ये ती क्षमता आहे. भारतात हर्षितच्या उंचीचे आणि सातत्याने १४० हून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करणारे फारसे गोलंदाज नाहीत. आम्ही आता २०२७ विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करत आहोत. आफ्रिकेतील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर हर्षितसारख्या गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते,’’ असे गिलने सांगितले.
