आगामी आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठीच्या सराव शिबीरातून भारताचा कर्णधार अनुप कुमारला वगळण्यात आलेलं आहे. २२ नोव्हेंबरपासून ईराणमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ईराणवर मात केली होती. त्यामुळे अनुपला सराव शिबीरात वगळण्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रो-कबड्डीत तामिळ थलायवाज संघाचा कर्णधार अजय ठाकूरला या शिबीरासाठी बोलावण्यात आलंय. अजय हा संघातला सर्वात सिनीअर खेळाडू आहे. जयपूर पिंक पँथर्सने जसवीर सिंह आणि मनजीत छिल्लर यांच्याबद्दल अजुन ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. निवड समितीने यंदाच्या स्पर्धेसाठी तरुण खेळाडूंना संधी देण्याचं ठरवलं आहे. प्रदीप नरवाल, प्रपंजन, रिशांक देवाडीगा, सचिन तंवर यासारख्या खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

१८ नोव्हेंबररोजी या स्पर्धेसाठीच्या अंतिम संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ३५ संभावीत खेळाडूंपैकी १२ खेळाडूंनाच अंतिम संघात स्थान मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजयासाठी फेव्हरिट मानला जात असला तरीही दक्षिण कोरिया आणि ईराण हे संघ भारताला चांगलीच टक्कर देऊ शकतात. अनुप कुमारच्या अनुपस्थितीत अजय ठाकूरकडे भारतीय संघाचं कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian kabaddi captain anup kumar not include in asian championship