Asia Cup 2025 Final IND vs PAK: भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामना खेळणार आहेत. या स्पर्धेतील भारत-पाक संघांमधील हा एकूण तिसरा सामना असणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. पण सामन्यांमधील कामगिरीपेक्षा दोन्ही संघांमध्ये झालेल्या वादामुळे ही आशिया चषक २०२५ स्पर्धा वर्षानुवर्षे चाहत्यांच्या लक्षात राहणार आहे. यादरम्यान फायनलपूर्वी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत व पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या मोठ्या प्रकरणानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ कोणत्याही स्पर्धेत पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. स्पर्धेपूर्वी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटले. भारतीय संघाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर आता अंतिम सामन्यापूर्वी घेतलेल्या एका निर्णयाने वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा मोडली आहे.

आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान कधीही जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने आलेले नाहीत. पण या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचं ट्रॉफीसह फोटोशूट मात्र झालेलं नाही.

भारताचा फायनलपूर्वी ट्रॉफी फोटोशूटलाही नकार?

कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार ट्रॉफीसह फोटोशूट करतात. पण यंदाच्या आशिया चषकात मात्र भारत आणि पाकिस्तान संघांतील कर्णधारांचं ट्रॉफीसह फोटोशूट करण्यात आलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये अधिकृत फोटोशूट होणार होते, पण टीम इंडियाने या फोटोशूटसाठी नकार दिला.

पाकिस्तानशी कोणताही संपर्क न ठेवण्याची आपली भूमिका कायम ठेवत, टीम इंडियाने स्पष्ट केलं की भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानी कर्णधार सलमान आघासह ट्रॉफीबरोबर फोटोशूट करणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेच्या ट्रॉफीसह पोज देण्याची परंपरा आहे.

टीम इंडियाचा हा निर्णय या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या निषेधाच्या मालिकेचा एक भाग आहे, जो दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यापासून भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नव्हतं. भारतीय कर्णधाराने नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. मग सामना संपल्यानंतरही टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही.

या हस्तांदोलन वादावरून मोठा गदारोळ झाला होता. दोन्ही संघांमधील सुपर फोर सामन्यादरम्यानही सारखंच दृश्य पाहायला मिळालं, ज्यामध्ये कर्णधार किंवा खेळाडू दोघांनीही सामन्यापूर्वी किंवा नंतर कोणताही संपर्क साधला नव्हता.