पीटीआय, बार्सिलोना
आघाडीपटू लालरेमसियामीच्या हॅट्ट्रिक च्या बळावर भारतीय महिला संघाने स्पेन हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंग्लंडवर ३-० असा विजय मिळवला.लालरेमसियामीने १३, १७ आणि ५६व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलमुळे भारताला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यात यश आले. यापूर्वी इंग्लंड (१-१) आणि स्पेन (२-२) यांच्याविरुद्ध भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र, भारतीय महिला संघ अपराजित असून गुणतालिकेत अग्रस्थानावर आहे. रविवारी भारताचा सामना स्पेनशी होणार आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, त्यांना गोल करता आला नाही. दुसरीकडे भारताने छोटे-छोटे पास देत गोलची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहा गोयलने गोलच्या दिशेने फटकाही मारला, पण इंग्लंडच्या बचाव फळीने तिला भारताला आघाडी मिळवून देण्यापासून रोखले. परंतु, १३व्या मिनिटाला अनुभवी मध्यरक्षक दीप ग्रेस एक्काने खोलवरून दिलेल्या पासवर लालरेमसियामीने गोल नोंदवत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने दुसऱ्या सत्रातही लय कायम राखली. १७व्या मिनिटाला लालरेमसियामीने वैयक्तिक चाल रचत इंग्लंडची गोलरक्षक सब्बी हीशला चकवले आणि भारताची आघाडी दुप्पट केली.
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. या सत्रात इंग्लंडला अधिक चांगल्या संधी मिळाल्या, पण त्यांना याचा फायदा करून घेता आला नाही. भारताने भक्कम बचाव करताना आपली आघाडी राखली. चौथ्या सत्रात इंग्लंडने आक्रमणाची गती वाढवली. मात्र, भारताने चोख प्रत्युत्तर देताना प्रतिहल्ला केला. त्यामुळे या सत्रात चुरस पाहायला मिळाली. अखेरीस भारतालाच गोलची संधी साधता आली. लालरेमसियामी ५६व्या मिनिटाला वैयक्तिक आणि भारताचा तिसरा गोल केला. त्यामुळे भारताने सहज विजय नोंदवला.