बांगलादेशातील सिल्हेट येथे संपन्न झालेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखत दारूण पराभव केला. कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२२चा आशिया जिंकत सातव्यांदा नाव कोरले. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. २५ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. भारतीय महिला संघाने केलेल्या या चमकदार कामगिरीचे अनेक स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये सर्व आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, माजी कर्णधार मिताली राज, गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह, सुनील जोशी अशा अनेक खेळाडूंनी तसेच वरिष्ठ सहकाऱ्यांनी हरमन ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया तुम्हीला येथे पाहायला मिळतील.
अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला होता एका क्षणी ५० धावा तरी होतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून फक्त दोघीनाच दोन आकडी संख्या गाठता आली. इनोका रणविरा आणि ओधाडी रणसिंघे यांनी अनुक्रमे १८ आणि १३ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.