मुंबई आणि दिल्ली यांच्यातील वानखेडे मैदानावरील सामन्यात दिल्लीने तडाखेबाज खेळी करून विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन (४३), कॉलिन इन्ग्राम (४७) आणि ऋषभ पंत (७८*) या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या सामन्यात २१३ धावांचा डोंगर उभारला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला हा भार पेलता आला नाही. पण युवराज सिंगने पुन्हा एकदा लढाऊ वृत्ती दाखवली आणि धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या दमदार पुनरागमनाचे चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले.

या सामन्यात चर्चा रंगली ऋषभ पंतची. त्याने पहिल्याच सामन्यात वानखेडेवर वादळी खेळी केली. पंतने २७ चेंडूंत ७८ धावांची धमाकेदार नाबाद खेळी केली. पंतने या खेळीत ७ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्याबद्दल बोलताना मुंबई इंडियन्सचा युवराज सिंग म्हणाला की विश्वचषकासाठी भारतीय संघातील निवडीबाबत मी आताच काही बोलणार नाही. पण त्याने केलेली वादळी खेळी ही अप्रतिम आणि अविश्वसनीय होती. मागील हंगामात देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच कसोटी संघातही त्याने आपली छाप पाडली आहे. प्रदेशात दोन शतके झळकावणे आणि तेदेखील केवळ २१ वर्षांचा असताना… ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. यावरूनच तो उत्तम पद्धतीचा खेळ करणारा खेळाडू आहे, याची कल्पना येते. त्याला योग्य संधी देण्यात आल्या पाहिजेत. कारण तो भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील एक महान खेळाडू ठरणार आहे, हा मला विश्वास आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या कॉलीन इंग्रामनेही पंतचे कौतुक केले. गेल्या वर्षी मी त्याला खेळताना पहिले आहे. त्याची फटकेबाज खेळी कायमच मला भावली आहे. त्याचे लयीत असणे आणि मोठ्या धावसंख्या उभारणे आमच्या संघाच्या दृष्टीने चांगलेच आहे. जेव्हा तो खेळतो, तेव्हा आमच्यासाठी मॅच विनर असतो आणि त्याची आज आम्हाला प्रचिती आली, असे तो म्हणाला.

दरम्यान, मुंबईकडून युवराज सिंह आणि कृणाल पांड्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. युवराजने अखेरपर्यंत आपली झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांपुढे त्याची डाळ शिजू शकली नाही. सलामीवीर रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे मुंबईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. यानंतर युवराजने मधल्या काही षटकांमध्ये संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कगिसो रबाडाने 2, तर ट्रेंट बोल्ट-तेवतिया-केमो पॉल-अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतला होता. पण त्याचा हा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर पृथ्वी शॉ (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६) झटपट माघारी परतले. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत दिल्लीला बळ दिले. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला गेला. पण दोघेही आपल्या अर्धशतकाला मुकले. पण त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने तुफान धुलाई केली. पंतने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, रसिख सलाम या वेगवेना माऱ्याला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. ऋषभने नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे ही धावसंख्या त्याने केवळ २७ चेंडूत उभारली. ७८ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या या खेळाचे मुंबई इंडियन्सच्या संघाकडूनही कौतुक झाले.