IPL 2019 SRH vs KXIP : हैदराबादच्या संघाने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी ८१ धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. पण राहुलच्या (७९) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने ३-३ बळी टिपले पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात ११ व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने चेंडू हवेत मारला. अश्विनने अप्रतिम अंदाज घेत चेंडू झेलण्यासाठी उडी मारली, पण नेमका त्याच वेळी उडी मारून जमिनीवर येताना त्याच्या हातून चेंडू निसटला. या गोष्टीमुळे अश्विन स्वतःवर काहीसा नाराज झालेला दिसला. पण त्याने नाराजी झटकून पटकन चेंडू पुन्हा उचलला आणि गोलंदाजाकडे दिला.

हा पहा व्हिडीओ –

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने ३ चेंडूत एका चौकारासह ४ धावा केल्या. त्यानंतर भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. लोकेश राहुल राहुल ७९ धावांवर बाद झाला. इतर कोणीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. त्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत ७८ धावांची भागीदारी केली. साहा (२८) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंची पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान वॉर्नरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन आश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.

यानंतर डेव्हिड वॉर्नरही माघारी परतला. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी यावेळी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना अर्शदीप सिंह आणि मुरगन आश्विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 srh vs kxip ashwin jump to take catch but drops it