या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शारजाहच्या मैदानावर पार पडलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्जने आपल्या छोटेखानी धावसंख्येचा बचाव करत सनरायझर्स हैदराबादवर ५ धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२५ धावा केल्या. हैदराबादचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने मयंक अग्रवाल आणि केएल राहुलला स्वस्तात बाद केले. त्यानंतर पंजाबच्या डावाला उतरती कळा लागली. प्रत्युत्तरात हैदराबादच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. जेसन होल्डरने मधल्या फळीत २९ चेंडूत ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा करत सामन्यात रंगत निर्माण केली, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. होल्डरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या विजयासह पंजाब गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हैदराबादचा डाव

पंजाबच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्याच षटकार सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नरला यष्टीपाठी झेलबाद केले. तिसऱ्या षटकात शमीने हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला बोल्ड केले. हैदराबादने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये २ बाद २० धावा केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमधील ही त्यांची सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. १२व्या षटकात हैदराबादने अर्धशतक पूर्ण केले. १३व्या षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईने केदार जाधव आणि अब्दुल समद यांना बाद करत सामन्याचे चित्र पालटायला सुरुवात केली. अवघ्या ६० धावांत हैदराबादने आपले ५ फलंदाज गमावले. या पडझडीनंतर जेसन होल्डर आणि वृद्धिमान साहा यांनी ३२ धावांची भागीदारी रचली. १७व्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या नादात साहा धावबाद झाला. साहाने महत्त्वपूर्ण ३१ धावा केल्या. एका बाजूने जेसन होल्डरने किल्ला लढवला. संघाने शतकी पल्ला गाठल्यानंतर अर्शदीपने सिंगने राशिदला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. होल्डरने २९ चेंडूत ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा करत सामन्यात रंगत निर्माण केली, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. हैदराबादचा संघ २० षटकात ७ बाद १२० धावापर्यंतच पोहोचू शकला. पंजाबकडून रवी बिश्नोईने ४ षटकात २४ धावा देत ३ बळी घेतले.

पंजाबचा डाव

मागील सामन्यात दमदार सलामी दिलेल्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना हैदराबादविरुद्ध मोठी भागीदारी करता आली नाही. हैदराबादचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने राहुलला २१ धावांवर तंबूत धाडले. याच षटकात होल्डरने पंजाबचा दुसरा सलामीवीर मयंक अग्रवाललाही विल्यमसनकरवी झेलबाद केले. पाच षटकात पंजाबची अवस्था २ बाद २७ धावा अशी झाली. त्यानंतर ख्रिस गेल आणि एडन मार्कराम यांनी १०व्या षटकात पंजाबचे अर्धशतक पूर्ण केले. ११व्या षटकात हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने गेलला पायचित पकडले. गेलला १४ धावा करता आल्या.त्यानंतर संदीप शर्माने निकोलस पूरनला तंबूचा मार्ग दाखवला. १५व्या षटकात अब्दुल समदने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या एडेन मार्करामला झेलबाद केले. मार्करामला २७ धावा करता आल्या. विल्यमसनने पुन्हा होल्डरला गोलंदाजी करण्यास बोलावले. त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात दीपक हुडा झेलबाद झाला. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या जगदीश सूचितने हवेत सूर मारत हुडाचा एकहाती झेल टिपला. १७व्या षटकात पंजाबने शतक पूर्ण केले.शेवटच्या षटकातही पंजाबला आपली धावगती वाढवता आली नाही. निर्धारित २० षटकात त्यांना ७ बाद १२५ धावा करता आल्या. हैदराबादकडून होल्डरने ४ षटकात १९ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले.

हेही वाचा – RCB vs CSK : “मी त्याला माझा भाऊ मानतो, पण तो…”, महेंद्रसिंह धोनीचं वक्तव्य चर्चेत

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन (कप्तान), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.

पंजाब किंग्ज: केएल राहुल (कप्तान), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 srh vs pbks live match report adn
First published on: 25-09-2021 at 19:03 IST