चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीने संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले, की तो ब्राव्होला आपला भाऊ मानतो पण दरवर्षी तो ब्राव्होशी कमी गतीचे चेंडू टाकण्याबाबत भांडतो. काल शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. प्रथम खेळताना आरसीबीने सहा गडी गमावून १५६ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात सीएसकेने हे लक्ष्य १८.१ षटकांत चार गडी गमावून सहज गाठले.

चेन्नई सुपर किंग्जच्या नेत्रदीपक विजयानंतर संघाचा कर्णधार धोनीने प्रतिक्रिया दिली. त्याने या सामन्यात चमकदार गोलंदाजी करणाऱ्या ड्वेन ब्राव्होचे कौतुक केले. तो म्हणाला, ”ड्वेन ब्राव्हो तंदुरुस्त आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. तो चांगली गोलंदाजीही करतो. मी त्याला माझा भाऊ मानतो. आम्ही दरवर्षी लढतो की त्याला इतक्या मंद गतीचे चेंडू टाकण्चाची गरज आहे का? मी त्याला फलंदाजांना चकमा देण्यासाठी ही गोष्ट करायला सांगितले होते, पण आता सर्वांना माहीत आहे, की ब्राव्हो मध्यम गतीने गोलंदाजी करतो. त्यामुळे सहा वेगवेगळ्या चेंडू टाकले पाहिजेत, मग तो यॉर्कर असो.”

हेही वाचा – IPL 2021 : सर्वत्र ‘ब्रोमान्स’चीच चर्चा! मॅच हरल्यानंतर विराट धोनीजवळ गेला, अन् त्यानं पाठीमागून…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ड्वेन ब्राव्होने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २४ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याला विराट कोहलीची विकेटही मिळाली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने ३८ धावा केल्या. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय आहे आणि आणखी एक विजय मिळवल्यानंतर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील.