आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या युएईत सुरु आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन युएईत केलं. २००८ साली या स्पर्धेला सुरुवात झाली, यानंतर पुढची १२ वर्ष आयपीएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आयपीएलच्या सामन्यांची क्रेझ असते. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरही आयपीएलचा चाहता आहे.

करिनाने नुकताच तैमुरचा हातात बॅट घेतलेला फोटो सोशल मीडियावर टाकत, आयपीएलमध्ये जागा आहे का?? असा प्रश्न विचारला होता.

करिनाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तैमुरचं कौतुक केलं. मात्र संधी साधत दिल्ली कॅपिटल्स संघाने तैमुरला भविष्यात दिल्ली संघाकडून खेळताना पाहायला आवडेल असं म्हणत त्याला खुली ऑफर दिली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. दुबईच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात करत दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.