Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders IPL Match Updates : आयपीएलचा १६ व्या हंगामाताली ३३ वा सामना ईडन गार्डनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगतदार सामना झाला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. अजिंक्य रहाणे, डवॉन कॉनवे आणि शिवम दुबेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने ४ विकेट्स गमावत २३४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना या सामन्यान विजय मिळवण्यात अपयश आलं. चेन्नईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं केकेआरचा पराभव झाला. रिंकू सिंगने आक्रमक फलंदाजी करत २२ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी केली परंतु कोलकाताला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. केकेआरने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १८६ धावा केल्यानं सीएसकेचा विजय झाला.
केकेआरसाठी सलामीला आलेल्या सुनील नारायणने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज आकाश सिंगने नारायणला शून्यावर बाद करून केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर एन जगदिशन फक्त १ धाव करून तंबूत परतला. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या जेसन रॉयने धमाका केला. चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी साकारली. परंतु तीक्षणाच्या फिरकीवर रॉयची दांडी गुल झाली आणि केकेआरला मोठा धक्का बसला. व्येंकटेश अय्यर २० धावांवर असताना मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रविंद्र जडेजाने कर्णधार नितीश राणाला २७ धावांवर बाद केलं. तर पथिराणाने आंद्रे रसलला ९ धावांवर माघारी पाठवलं.
कोलकाता फिरकीपटू सुयश शर्माने गुगली टेंडू फेकून ऋतुराजला ३५ धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवॉन कॉनवेनं सावध खेळी करत धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. परंतु, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉनवे ५६ धावांवर बाद झाल्यानंतर सीएसकेला दुसरा धक्का बसला. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं आक्रमक अंदाजात फलंदाजी करत चेन्नईच्या धावसंख्येची गती वाढवली. तसंच शिवम दुबेनंही चौकार-षटकारांचा पाऊस पाडत कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मात्र, कोलकाताचा गोलंदाज कुलवंत खेज्रोलियाने शिवमला ५० धावांवर बाद केलं आणि कोलकाताला ब्रेक थ्रू दिला. शिवमने २१ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५० धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली.
