Parth Jindal On Mumbai Indians vs Delhi Capitals Match : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुसऱ्या मैदानावर खेळवण्यात यावा अशी मागणी दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी बीसीसीआयकडे केली आहे. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना रद्द होऊ नये म्हणून पार्थ जिंदाल यांनी ई–मेलद्वारे बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे.
पार्थ जिंदाल यांनी आपल्या ई–मेलमध्ये काय लिहिले?
मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द होऊ शकतो. असं झाल्यास दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग कठीण होऊ शकतो. त्यामुळे आधीच हा सामना मुंबई ऐवजी दुसऱ्या मैदानावर खेळवण्यात यावा अशी मागणी पार्थ जिंदाल यांनी केली आहे.
जिंदाल यांनी आपल्या ई– मेलमध्ये लिहिले, “ मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे. आम्हाला सहा दिवसांपासून माहीत आहे की, २१ मे रोजी मुंबईत पाऊस पडणार आहे. जसं आरसीबी आणि हैदराबादच्या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे, तसंच उद्या होणाऱ्या सामन्याच्या ठिकाणातही बदल करण्यात यावा. ”
मुंबईत यलो अलर्ट
हवामान विभागाने मुंबईत यलो अलर्ट दिला आहे. आज होणाऱ्या सामन्यातही पावसामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. मंगळवारी देखील मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केली. दोन्ही संघ सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. मात्र पावसामुळे हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. हा सामना जिंकून मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. तर दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १४ गुणांची कमाई केली आहे. तर दिल्लीने आतापर्यंत १३ गुणांची कमाई केली आहे.
हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण दिला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ आपला शेवटचा सामना पंजाबविरूद्ध खेळणार आहेत. मुंबईने हा सामना जिंकला, तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. जर मुंबईने हा सामना गमावला, तर दिल्लीकडे शेवटचा सामना जिंकून प्लेऑफ गाठण्याची संधी असणार आहे.