Jasprit Bumrah Statement On His Retirement: गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट चाहत्यांना ३ मोठे धक्के बसले आहेत. भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू असताना आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर रोहित शर्माने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. एका आठवड्यानंतर विराटनेही पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटला रामराम करत असल्याची घोषणा केली. हे सर्व इंग्लंड दौऱ्यापूर्वी झालं आहे. त्यामुळे, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट चाहते या धक्क्यातून सावरणार इतक्यात,जसप्रीत बुमराहने देखील निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यावर जसप्रीत बुमराहवर मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र, त्याची फिटनेस हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. फिटनेसमुळे तो मालिकेतील सर्व सामने खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. या दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनसारखे अनुभवी खेळाडू नसणार आहेत, त्यामुळे जसप्रीत बुमराहची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे.

कारकिर्दीपेक्षा कुटुंब महत्वाचं

या दौऱ्यावर जाण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वर्कलोड आणि कुटुंब या विषयावर चर्चा केली. बुमराहने स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याच्यासाठी कुटुंब जास्त महत्वाचं आहे. या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्यासाठी कारकिर्दीपेक्षा कुटुंब जास्त महत्वाचं आहे. कारण ते शेवटपर्यंत असेल. दोन गोष्टी आहेत ज्या मी खूप गांभीर्याने घेतो. एक म्हणजे माझं कुटुंब आणि दुसरं म्हणजे माझा खेळ. पण कुटुंब आधी येतं.”

इंग्लंड दौऱ्यासाठी शुबमन गिलची भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या जागेसाठी जसप्रीत बुमराहच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, फिटनेसचा मुद्दा लक्षात घेता ही जबाबदारी बुमराहकडे सोपवण्यात आलेली नाही. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यामुळे बुमराह पाच सामन्यांसाठी उपलब्ध असेल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आलेली नाही. रोहित शर्मा कर्णधार असताना उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे होती. रोहितच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व देखील केलं होतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family first then carer jasprit bumrah hints test retirement cricket news in marathi amd