David Warner Prediction On IPL 2025 Winner: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायरचा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कोणता संघ आयपीएल २०२५ स्पर्धेची ट्रॉफी उंचावणार, याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. त्यावेळी वॉर्नरला आयपीएलमध्ये कोणता संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, ” माझ्या मते, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावू शकतो. जोश हेजलवूड सामनावीर पुरस्कार पटकावू शकतो.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गाठली आयपीएल २०२५ स्पर्धेची फायनल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकतर्फी विजयाची नोंद करत फायनलमध्ये प्रवेश केला. यासह या संघाने ८ वर्षानंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या हंगामातील फॉर्म पाहता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यापैकी जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध भिडणार आहे.

८ वर्षांनंतर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश

यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी २०१६ मध्ये या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.