Harbhajan Singh Statement on Mumbai Indians Performance in IPL 2024: आयपीएल २०२४ चा हंगाम आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचला असून आजपासून म्हणजेच २१ मे पासून प्लेऑफच्या लढती सुरू होणार आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी आणि प्रसिद्ध संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीने सर्वांनाच अवाक केले आहे. मुंबईच्या कामगिरीवरील चर्चा काही थांबण्याचे नाव नाही घेत आहे. यावर आता हरभजन सिंगच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई इंडियन्सने IPL 2024 साठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला की, मुंबई इंडियन्स संघाच्या या स्थितीला संघातील वरिष्ठ खेळाडू जबाबदार आहेत. हरभजन सिंगने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव किंवा अन्य कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र या हंगामात वरिष्ठ खेळाडू संघाला एकत्र ठेवू शकले नाहीत, असे त्याचे मत आहे.

हेही वाचा – IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल

हरभजन सिंगने मुंबई इंडियन्सच्या कामगिरीसाठी रोहित शर्माला धरलं जबाबदार?

हरभजन सिंगला जेव्हा मुंबई इंडियन्सच्या खराब स्थितीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मुंबई इंडियन्स हा खूप मोठा संघ आहे, मी त्या फ्रँचायझी संघासाठी १० वर्षे खेळलो आहे, तेथील संघ व्यवस्थापनही खूप चांगले आहे, प्रत्येक गोष्ट, अगदी सुरळीतपणे चालवली जाते. आणि संघाचा कर्णधार बदलण्याचा हा जो काही निर्णय घेतला गेला, तो संघावरच उलटला. हार्दिक पांड्या आला आणि कर्णधार झाला. मला वाटते की हा निर्णय भविष्यासाठी घेतला गेला. परंतु माझ्या मते ती योग्य वेळ नव्हती. हार्दिकला एका वर्षभरानंतर ही जबाबदारी सोपवायला हवी होती. मी जेव्हा संघाला खेळताना पाहत होतो तेव्हा थोडे वेगळे वाटत होते, कर्णधार वेगळा होता, संघ वेगळा होता, काही मुलं नवीन होती. त्यामुळे विखुरलेला संघ दिसत होता.”

हेही वाचा – IPL 2024: रोहित शर्माने अखेरीस सोडले मौन, MIच्या कामगिरीबद्दल झाला व्यक्त; फलंदाजीबाबतही दिले प्रामाणिक उत्तर

या सगळ्यात हार्दिक पांड्याचा काहीच दोष नाही, असे हरभजन सिंगचे मत आहे, तो पुढे म्हणाला, “एवढ्या मोठ्या संघाची अशी घसरण होताना पाहून मला वाईट वाटले. त्यामुळे कर्णधार बदलण्याचा जो निर्णय घेण्यात आला, त्याची वेळ योग्य नव्हती असे मला वाटते, वर्षभरानंतर हार्दिककडे ही जबाबदारी सोपवली असती तर बरे झाले असते. कारण हार्दिक पंड्या गुजरातच्या संघात खरंच चांगली कामगिरी करत होता. तो तिथेही कर्णधार होता, त्यामुळे इथे हार्दिक पंड्याचा दोष नाही. खरंतर इथे जबाबदारीही वरिष्ठ खेळाडूंवर होती की त्यांनी संघाला एकत्र बांधून ठेवायला हवं होतं. मग कर्णधार कोणीही असो. संघ आधी येतो, तुम्ही आधी संघाचा विचार करा. बघा, कर्णधार येतील, कर्णधार जातील, पण संघ कायम राहील.”

मुंबई इंडियन्ससाठी १४ सामन्यांमध्ये, पंड्याने १८ च्या सरासरीने आणि १४३.०४ च्या स्ट्राइक रेटने २१६ धावा केल्या, ४६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याने ३५.१८ च्या सर्वसाधारण सरासरीने आणि १०.७५ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्स घेतल्या.