Hardik Pandya Mental Health: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा विश्वचषकापर्यंत कोट्यवधी भारतीयांसाठी हिरो होता पण यंदाच्या आयपीएलची घोषणा होताच असं काही घडलं की हार्दिकला अक्षरशः दूषणं देऊन खलनायक बनवणाऱ्यांची संख्या वाढू लागली. असं नेमकं काय घडलं हे तुम्हीही जाणता, तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलेल्या आणि प्रचंड फॅन फॉलोईंग असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून घेत हार्दिकच्या हाती सोपवण्यात आलं. तेव्हापासूनच रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात मैदानात हार्दिक येताच स्टेडियममधून अपशब्द उच्चारले जायचे, शिवीगाळ करत घोषणा दिल्या जायच्या. काही माजी खेळाडूंनी हे थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण प्रेक्षकांमधील राग काही केल्या कमी झाला नाहीच. यासगळ्यानंतर आता हार्दिकवर मानसिक ताण वाढत आहे आणि तो प्रचंड दबावाखाली आहे अशी माहिती माजी सलामीवीराने एका युट्युब पॉडकास्टमध्ये दिली आहे.

हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय?

माजी T20 विश्वचषक विजेते आणि सलामीवीर रॉबिन उथप्पा यांनी अलीकडेच रणवीर शो (युट्युब) वर हार्दिकच्या मानसिक स्थितीविषयी एक मोठं विधान केलं होतं, ते म्हणतात की, “या सगळ्या नकारात्मकतेमुळे हार्दिकला फलंदाज, गोलंदाज किंवा चांगला कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध करता येत नाहीये. आतापर्यंत संघाने अवघे तीन विजय मिळवले आहेत यासगळ्यापाठी हार्दिकबाबत चालू असलेलं ट्रोलिंग सुद्धा कारणीभूत आहे.

त्याला चाहत्यांकडून मिळत असलेली वागणूक अन्यायकारक आहे. तो एक असा माणूस आहे, ज्याच्यात आयपीलच नाही तर संपूर्ण भारतीय संघासाठी महान योगदान देण्याची क्षमता आहे. ज्या संघाने त्याची क्षमता ओळखली होती त्यांनीच त्याला रिलीज केलं होतं, तो दुसऱ्या फ्रँचायझीकडे गेला,तिथेही त्याने एकदा विजेतेपद व दुसऱ्यांदा उपविजेतेपद जिंकलं होतं. त्याला या सगळ्यात कदाचित आपण जिथून सुरुवात केली तिथे नसल्याचं वाईट वाटलं असावं म्हणून तो परत आला असेल. “

तुम्ही भावुक आहात पण म्हणून अशी वागणूक योग्य आहे का?

“आता त्याच्या फिटनेसबद्दल चेष्टा, ट्रोलिंग, मीम्स यासगळ्याचं प्रमाण इतकं वाढलंय, तुम्हाला वाटत नाही का की यामुळे तो दुखावला जात असावा? अर्थात त्याला वाईट वाटत असणार, कोणालाही याचा त्रास होऊ शकतो. किती लोकांना यामागील वास्तविकता माहित आहे? हार्दिक नक्कीच मानसिक तणावाचा सामना करत असणार. मी सुद्धा हे समजू शकतो की भारतीय क्रिकेटच्याबाबत खूप भावुक आहेत पण अशाप्रकारची वागणूक कोणत्याही व्यक्तीला देणं योग्य नाही. शिवाय एक समाज म्हणून आपण हे घडताना बघणं आणि त्याविषयी आपल्याला तक्रार नसणं हे ही चुकीचं आहे. आपण यावर हसणं, मीम्स फॉरवर्ड करणं थांबवायला हवं.”

हे ही वाचा<< Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

विश्वचषकाच्या नंतर भारतीयांची सर्वात सुंदर प्रतिक्रिया

“मला असं वाटतं की खेळाडूंसाठी क्रिकेटही नक्कीच आवड असली, तरी ते आमचं काम आहे, आमची ‘रोजी रोटी’ आहे. फक्त तुम्ही आमचं काम टीव्हीवर बघू शकता पण त्यावर टीका करण्याची मुभा असते. एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीबाबत हे घडत नाही. अशावेळी तुम्ही सर्वांसमोर असलेल्या त्या व्यक्तीला कधी कधी समजून घेण्याची, सहानुभूती दाखवण्याची, सन्मानाने वागवण्याची गरज असते. तो कधीतरी अपयशी होणार आहे हे समजून घ्यायला हवं. आपण विश्वचषकाच्या वेळी ज्यापद्धतीने आपल्या संघाच्या पाठीशी उभे राहिलो तसंच आपण प्रत्येक व्यक्तीच्या पाठी समाज म्हणून उभं राहायला हवं.”

हे ही वाचा<< विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video

हार्दिक पंड्याचा आयपीएल २०२४ रेकॉर्ड

या आयपीएलमध्ये पहिल्या ७ सामन्यांमध्ये हार्दिकने २३.५० च्या सरासरीने एकही अर्धशतक न करता १४१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीविषयी सांगायचं तर, हार्दिकने केवळ ४ विकेट्स घेतल्या आहेत आणि 11 आरपीओच्या इकॉनॉमी रेटने धावा काढल्या आहेत.