MI vs DC Naman Dhir Innings: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७३ धावांच्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं. पण याचदरम्यान ८ चेंडूत २४ धावा करत नमन धीरने मुंबईला जीवदान दिलं. नमन धीरने १९व्या षटकात फलंदाजीला येत २७ धावा करत चौकार-षटकारांसह सामना मुंबईच्या बाजूने वळवला आणि त्यानंतर अखेरच्या षटकात सूर्यादादाच्या फटकेबाजीने १८० धावांचा टप्पा गाठला. मुंबईचा नवा फिनिशर नमन धीरच्या या खेळींमध्ये कायरन पोलार्डचं मोठं योगदान आहे.

मुंबई इंडियन्सचा नवा फिनिशर म्हणून नावारूपाला येत असलेला नमन धीरने त्याच्या अखेरच्या षटकांतील उत्कृष्ट खेळीचं श्रेय कायरन पोलार्डला दिलं आहे. नमनने आयपीएल २०२५ च्या हंगामात आपल्या प्रगतीचे श्रेय पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या सामन्यात, धीर आणि सूर्यकुमार यांनी शेवटच्या दोन षटकांत ४८ धावा ककत मुंबईला ५ बाद १८० अशी मजल मारण्यास मदत केली.

आयपीएलचा पहिलाच पूर्ण हंगाम खेळणाऱ्या शांत स्वभाव असलेल्या नमनने विस्फोटक खेळीसह उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने १३ सामन्यांमध्ये १८२.३५ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने आणि ३७.२० च्या सरासरीने १८६ धावा केल्या आहेत. फिनिशरची जबाबदारी सोपवलेल्या तरुण फलंदाज म्हणून हा एक उत्कृष्ट आकडा आहे.

नमन धीर सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला, आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही चेंडू नीट पाहून त्यावर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही दररोज नेटमध्ये असाच सराव करतो. मी रोज पॉलीशी (कायरन पोलार्ड) याबद्दल चर्चा करतो, याची मला खूप मदत झाली. पॉली आणि हार्दिकशी बोलल्याने मला खूप मदत होते.

सूर्या आणि तिलकची भागीदारी खूप महत्त्वाची होती. चेंडू थोडा टर्न होत होता. विकेट खूप स्लो होती. त्या दोघांच्या खेळीने संघाला एक चांगला पाया रचून दिला. त्यांनी धावा काढण्यासाठी संघर्ष केला असं मला वाटलं नाही. त्यांना शेवटच्या षटकांसाठी विकेट राखून ठेवायच्या होत्या,” असे दिल्ली कॅपिटल्सवरील विजयानंतर नमन धीरने पत्रकारांना सांगितले.

कायरन पोलार्ड हा आयपीएल इतिहासात गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक उत्कृष्ट फिनिशर म्हणून भूमिका चोख बजावली आहे. पोलार्डने स्वबळावर अनेक सामने मुंबईला एकहाती जिंकून दिले आहेत. मुंबईच्या विक्रमी ५ ट्रॉफी जिंकण्यामध्ये पोलार्डचंही मोठं योगदान आहे. आता मुंबईचा फलंदाजी कोच असलेला पोलार्ड नमन धीरच्या रूपात एक नवा फिनिशर तयाप करत आहे.

नमन धीर कायरन पोलार्डबद्दल बोलताना म्हणाला, “पॉलीकडे (कायरन पोलार्ड) खूप अनुभव आहे. त्याने जवळपास ७०० सामने खेळले आहेत. तो मला गोलंदाजांची ताकद आणि त्यांच्या कमकुवत बाजूंबद्दल धडे देत असतो. आम्ही गोलंदाजांचे बरेच व्हिडिओ देखील पाहतो. त्यानुसार, मी रणनिती आखतो. कधीकधी, या रणनिती मी अंमलात आणतो, कधीकधी यशस्वी होत नाही. आज, माझा दिवस होता. संघ खूप आनंदी आहे.”