आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स उर्वरित हंगामात सहभागी होणार आहे. आयपीएल खेळण्यासाठी बेन स्टोक्स न्यूझीलंडवरुन युएईला रवाना झाला आहे. स्टोक्स विमानात बसल्याचा फोटो राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Stoked. #HallaBol | #RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/pcAvyIcaaF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 3, 2020
बेन स्टोक्सच्या वडीलांवर काही दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. आपल्या परिवारासोबत राहता यावं यासाठी बेन स्टोक्सने पाकिस्तान दौऱ्यावरुन माघार घेत न्यूझीलंडला जाणं पसंत केलं होतं. आयपीएल सुरु झाल्यानंतरही स्टोक्स यंदा खेळणार की नाही याबद्दल ठोस माहिती मिळाली नव्हती. परंतू त्याच्या वडीलांची तब्येत लक्षात घेता त्याने यंदा आयपीएल खेळावं म्हणून कोणतीही सक्ती नसल्याचं राजस्थान रॉयल्सने स्पष्ट केलं होतं.
काही दिवसांपूर्वी स्टोक्सने न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबमध्ये सरावाला सुरुवात केली होती. यानंतर अखेरीस स्टोक्स आयपीएलसाठी रवाना झाला आहे. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. ३ सामन्यांत २ विजय आणि एका पराभवासह राजस्थान पाचव्या स्थानावर आहे.