मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातला सलामीचा सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. संध्याकाळी साडे सात वाजता अबु धाबीच्या मैदानावर स्पर्धेच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होईल. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलेलं आहे. सलामीचा सामना म्हटलं की नाणेफेकीकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असतं. अनेकदा टी-२० क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक संघाचा प्रथम फलंदाजी करण्याकडे कल असतो.

परंतू आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामातील सलामीच्या सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नाणेफेकीनंतर पहिल्यांदा फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी हा प्रश्न फारसा महत्वाचा ठरत नाही. कारण आतापर्यंतच्या १२ हंगामांपैकी सहा हंगामात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला असून सहावेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.

यंदा सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांसमोर अनेक आव्हानं आहेत. मुंबईला संपूर्ण हंगाम लसिथ मलिंगाशिवाय खेळावा लागणार आहे तर चेन्नईला रैना आणि हरभजन या आपल्या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई इंडियन्सचं पारडं हे जड मानलं जातंय. त्यामुळे सलामीच्या सामन्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.