IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: वानखेडे मैदानावर झालेल्या मुंबई-चेन्नईच्या हायव्होल्टेज सामन्याची सगळीकडे चर्चा आहे. माजी खेळाडू, क्रिकेटप्रेमी, चाहते, कलाकार यांच्या सोशल मीडियावर कमी अधिक प्रमाणात या सामन्याबद्दल चर्चा सुरू आहे. धोनीची षटकारांची हॅटट्रिक, रोहित शर्माचे शतक, मथीशा पथिरानाचे ४ विकेट्स हे सध्या चर्चेत आहेत. तर यादरम्यानच भारतातील प्रसिध्द उद्योगपती असलेले आनंद महिंद्रा यांनी धोनीच्या वादळी खेळीविषयी एक पोस्ट केली आहे.

धोनीचा चाहता वर्ग किती मोठा आहे, याच आपल्या सर्वांनाच अंदाज आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे, ज्यांनी एमएस धोनीच्या खेळीचे भन्नाट अंदाजात कौतुक केले. एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी कॅप्टन कूलचे त्याच्या विस्फोटक खेळीसाठी कौतुक केले.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटले- “अवास्तव अपेक्षा आणि दडपणाखाली असतानाही या व्यक्तीपेक्षा अधिक उत्कृष्ट कामगिरी करणारा एखादा खेळाडू तुम्ही सांगू शकता का? अशी खेळी त्याचा उत्साह अधिक वाढवणारी आहे. मी कृतज्ञ आहे की माझे नाव Mahi-ndra आहे”

ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्रतिसाद दिला असून लाखो लाईक्स दिसत आहेत. तर त्यांच्या या पोस्टवर जिओने कमेंट केली आहे. एका युजरने म्हटले की धोनी महिंद्रा कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असला पाहिजे, त्याच्या नावातही माही आहे. तर आनंद महिंद्रा यांनी सांगितले की माही स्वराज ट्रॅक्टर्ससाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

४२ वर्षीय धोनीच्या या जुन्या अंदाजातील विस्फोटक खेळीने सर्वांनाच चकित केले आहे. सोशल मीडियावर धोनीच्या या षटकारांचे फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहेत.