KKR vs SRH Highlights, IPL 2024: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरकडून सुनील नारायण आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी सुरुवात केली. या दोघांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. नंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या टी नटराजनने गुरबाजला झेलबाद केले. यानंतर सुनील नारायण आणि व्यंकटेश यांनी संघाची धुरा सांभाळली. त्यानंतर गोलंदाजीकडे परतलेल्या कर्णधार पॅट कमिन्सने सुनील नारायणला बाद केले.
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार फलंदाजी करत १४व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघासाठी फायदेशीर ठरला नाही. संघाने झटपट विकेट गमावत अवघ्या १५९ धावा केल्या. संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला.
IPL 2024, Qualifier 1 KKR vs SRH Live Score: कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात ८ विकेट्सने मोठा विजय मिळवत थेट फायनलचे तिकीट मिळवले आहे.
दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहायला गेलं तर केकेआरचा संघ वरचढ आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम चांगला आहे. दोन्ही संघांमध्ये २६ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी केकेआरने १७ सामने जिंकले आहेत आणि हैदराबादने ९ वेळा विजय मिळवला आहे.