Jitesh Sharma Shot Video, RCB vs PBKS:आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० षटकांअखेर ९ गडी बाद १९० धावांचा डोंगर उभारला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने २४ धावा चोपल्या. यादरम्यान जितेश शर्माने एक भन्नाट शॉट मारला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पंजाबच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. पहिल्या षटकात फिल सॉल्टने १३ धावा चोपल्या. मात्र, त्यानंतर काइल जेनिसनने त्याला बाद करत माघारी धाडलं. सॉल्ट बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मयांक अगरवाल फलंदाजीला आला. त्याने काही आकर्षक फटके मारले. २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने २४ धावांची खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदारने २६ धावांची खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टनने २५ धावांची खेळी केली.
जितेश शर्माचा भन्नाट शॉट
तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी काईल जेमिसन गोलंदाजीला आला. त्यावेळी जितेश शर्मा स्ट्राईकवर होता. जेमिसनने पहिलाच चेंडू गुड लेन्थवर टाकला. या चेंडूवर जितेश शर्माने आगळा वेगळा शॉट मारला. त्याने लगान स्टाईल किपरच्या डोक्यावरून षटकार मारला. हा शॉट पाहून समालोचन करत असलेला एबी डिव्हिलियर्सही शॉक झाला. या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ३ फलंदाज तंबूत
या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. या षटकात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील ३ फलंदाजांना माघारी पाठवलं. आधी त्याने रोमारियो शेफर्डला बाद केलं. त्यानंतर कृणाल पांड्या आणि शेवटी भुवनेश्वर कुमारला बाद करत माघारी धाडलं.