Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL Latest Score Update: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३९व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात ईडन गार्डन्स मैदानावर सामना होत आहे. या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १७९ धावा केल्या. केकेआरसाठी रहमानउल्ला गुरबाजने ३९ चेंडूत ८१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तर शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या बर्थडे बॉय आंद्रे रसेलने १९ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. गुजरातकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने ३ बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने केकेआरटी पहिली विकेट मिळवली. त्याने एन जगदीशनला वैयक्तिक १९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर केकेआर संघाने शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आणि शार्दुल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. ४७ धावांवर केकेआरला दुसरा धक्का बसला. पहिल्या ६ षटकात २ गडी गमावून ६१धावांपर्यंत मजल मारण्यात संघाला यश आले.

व्यंकटेश अय्यरने रहमानउल्ला गुरबाजला थोडी साथ दिली. परंतु तोही ११ धावांवर बाद झाला. त्याचबरोबर कर्णधार नितीश राणाही त्याच्या १००व्या आयपीएल सामन्यात फ्लॉप ठरला. नितीश राणाने ४ धावा केल्या. एका बाजूने गडी बाद होत असताना युवा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने दुसरी सांभाळली. त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर संघाची धावसंख्या १५० च्या जवळ नेली.

हेही वाचा – IPL 2023: कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात राशिद खान आणि नितीश राणाने झळकावले ‘हे’ विशेष शतक, घ्या जाणून

गुरबाजने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ८१ धावांची तुफानी खेळी केली. शेवटी, रिंकू सिंगने १९ धावांची खेळी खेळली, तर आंद्रे रसेलने छोटी धमाकेदार खेळी खेळून संघाची धावसंख्या १७९ पर्यंत नेली. आंद्रे रसेलने १९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीने ३ तर नूर अहमद आणि जोश लिटलने २-२ बळी घेतले.