Why Rohit Sharma is Playing as Impact Player in IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चांगल्या फॉर्मात परतला आहे. यासह मुंबईने सलग ६ सामने जिंकत टॉप-४ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसत आहे. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा मैदानावर दिसत होता पण आता तो फक्त फलंदाजीला उतरतो, यामागचं कारण आता समोर आलं आहे.
रोहित शर्मा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुख्य खेळाडू होता पण नंतर त्याची भूमिका बदलण्यात आली. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आता रोहित शर्माला एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याबाबत माहिती दिली आहे. महेला जयवर्धने या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की संघाला सीमारेषेवर वेगवान क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे.
६ मे ला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना जयवर्धने म्हणाले, “सुरुवातीला हा निर्णय घेण्यात आला नव्हता. रो (रोहित) काही सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करतानाही दिसला होता. पण जर तुम्ही संघ संयोजन पाहिले तर बहुतेक खेळाडू दुहेरी भूमिका बजावतात. बहुतेकदा गोलंदाजी करतात. याचबरोबर काही मैदानांवर असे खेळाडू हवे असतात जे सीमारेषेजवळ धावून क्षेत्ररक्षण करतील. त्यामुळे संघाला अशाप्रसंगी वेगाने धावणाऱ्या खेळाडूंची गरज असते आणि या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं.”
पुढे जयवर्धने म्हणाले, “चॅम्पियन्स ट्रॉफीपासून रोहित शर्माला किरकोळ दुखापत झाली होती, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर जास्त दबाव आणायचा नव्हता आणि आम्ही ते करण्यात यशस्वी झालो कारण त्याची फलंदाजी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
रोहितने मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपले योगदान दिले आहे, असंही कोचने सांगितलं. जयवर्धने म्हणाले, “तुम्ही जर नीट पाहिलं असेल, तर तो नेहमीच डगआउटमध्ये असतो. पण तो टाईआऊटच्या वेळेस मैदानात जातो आणि तिथे चर्चाही करतो. यासर्व गोष्टींमध्ये रोहित शर्मा सहभागी असतो.”
मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकांनी माहिती दिली की, रोहित आणि रायन रिकेल्टन यांनी डावाची सुरुवात केल्याने संघाला फायदा झाला आहे. कोच म्हणाले, “कोणत्याही संघासाठी, सलामीवीर डाव उभारण्यात मौल्यवान भूमिका बजावतात आणि संघाकडे ज्या प्रकारची फलंदाजी आहे, त्यामुळे ते संघाला चांगली सुरुवात करून देतात. रोहित जरी गेल्या काही वर्षांत मोठी धावसंख्या उभारू शकला नसला तरी तो आम्हाला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न करतो. मी मुख्य प्रशिक्षक नसतानाही, मी पाहत होतो आणि तो मोठी खेळी करू शकला नसला तरी २०-३० धावा वेगाने करत होता”, असं कोचने सांगितलं आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना उद्या म्हणजेच ६ मे ला घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरूद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईचा संघ जिंकल्यास १६ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचू शकतो.
© IE Online Media Services (P) Ltd