दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत २०१ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर लावण्यात आला. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त ७ धावा केल्या. बंगळुरूकडून डीव्हिलियर्स आणि विराटने ८ धावांचे आव्हान पार करत विजय मिळवला.

या सामन्याबाबत सचिनने अतिशय मोजक्या शब्दात ट्विट केले. “दोन्ही संघ छान खेळले. (पण) क्रिकेट अविश्वसनीय दर्जाचं होतं”, असं त्याने सामन्याचं वर्णन केलं. याशिवाय तेंडुलकरने सामना सुरू असतानाही काही ट्विट केली. “हाहाहा… विश्वासच बसणार नाही असा सामना … आणखी काय वर्णन करणार..”, असं ट्विट त्याने केलं होतं. तसेच इशान किशन आणि कायरन पोलार्डच्या खेळीबद्दल सचिनने “नि:शब्द” असं ट्विट करत दोघांनी टॅग केलं होतं.

रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर सलामीवीर फिंच आणि पडीकल फलंदाजीस आले. दोघांनी अर्धशतकं ठोकत बंगळुरूला चांगली सलामी मिळवून दिली. फिंच (५२) आणि पडीकल (५४) बाद झाल्यावर लगेच विराटही ३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबेने फटकेबाजी केली. डीव्हिलियर्सने २४ चेंडूत ५५ धावा केल्या तर शिवम दुबेने १० चेंडूत २७ धावा केल्या. त्यांच्या फटकेबाजीमुळेच RCBने २०१ धावांचा टप्पा गाठला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने १ बळी घेतला.

२०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (८), क्विंटन डी कॉक (१४), सूर्यकुमार यादव (०) आणि हार्दिक पांड्या (१५) यांनी चाहत्यांची निराशा केली. पण इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटपर्यंत खिंड लढवली. इशान किशन शेवटच्या षटकात ५८ चेंडूत ९९ धावा (२ चौकार, ९ षटकार) करून बाद झाला. पण पोलार्डने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला. पोलार्डने २४ चेंडूत नाबाद ६० धावा (३ चौकार, ५ षटकार) केल्या. पण सुपर ओव्हरमध्ये मात्र मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.