Dream11 IPL 2020 DC vs KKR: दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झालेल्या अतिशय रोमांचक सामन्यात दिल्लीने कोलकाता संघावर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने शारजाच्या मैदानावर श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या अर्धशतकांच्या बळावर कोलकाताला २२९ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये ३० चेंडूत ७८ धावांची भागीदारी करत कोलकाताच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या. पण अखेर त्यांना १८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण ३ धावांवर बाद झाला. शुबमन गिलला चांगली सुरूवात मिळाली पण तो २२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. आंद्रे रसेलही १३ धावांवर माघारी परतला. त्याच षटकात दिनेश कार्तिकलाही मोठा फटका खेळण्याचा मोह आवरवा नाही. त्याने षटकार मारण्याच्या उद्देशाने हवाई फटका खेळला. त्याने मारलेला चेंडू धवनपासून लांब होता, पण त्याने अप्रतिम झेप घेत चेंडू झेलला आणि त्याला ६ धावांवर माघारी धाडलं.

कोलकाताकडून नितीश राणाने फटकेबाजी करत ३५ चेंडूत ५८ धावा केल्या. इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी या दोघांनीही ३० चेंडूत ७८ धावा कुटल्या. त्यामुळे सामन्यात रंगत आली होती. पण मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाल्याने अखेर कोलकाताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय प्रचंड फसला. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. धवन २६(१६) धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले, पण मोठा फटका खेळताना तो ६६(४१) धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी केली. तो ५ चौकार आणि एका षटकारासह ३८(१७) धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा ठोकल्या. त्याने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. या फटकेबाजी जोरावर दिल्लीने २० षटकात ४ बाद २२८ धावा केल्या. रसेलने सर्वाधिक २ बळी टिपले.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outstanding catch video shikhar dhawan gabbar ipl 2020 dc vs kkr dinesh karthik diving ahead catch vjb