Jitesh Sharma Catch: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्जच्या फलंदाजांना नागीण डान्स करायला भाग पाडलं. पंजाबचा संपूर्ण डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून पंजाबच्या फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला. पंजाबचे फलंदाज सुरूवातीपासूनच दबावात दिसून आले. याचा फायदा घेत, आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. सलामी जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण प्रभसिमरनसिंग आणि प्रियांश आर्या महत्वाच्या सामन्यात स्वस्तात माघारी परतला.
प्रियांश आर्या ७ तर प्रभसिमरन सिंग अवघ्या १८ धावांवर माघारी परतला. गेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा जोस इंग्लिश या डावात अवघ्या ४ धावा करत तंबूत परतला. कर्णधार श्रेयस अय्यरही २ धावा करत माघारी परतला. त्यानंतर नेहाल वढेरा ८, मार्कस स्टोइनिस २६, शशांक सिंग ३, मुशीर खान ०, अजमतुल्लाह उमरजई १८ आणि हरप्रीत ब्रार अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. पंजाब किंग्ज संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला.
जितेश शर्माने घेतला भन्नाट कॅच
या डावातील १५ वे षटक टाकण्यासाठी जोश हेजलवूड गोलंदाजीला आला.या षटकातील पहिल्याच चेंडूवर अजमतुल्लाह उरमजईने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षण करत असलेल्या जितेश शर्माच्या हातात गेला. हा झेल मुळीच सोपा नव्हता. कारण चेंडू बॅटला लागताच वेगाने वर गेला. पण जितेशने उडी मारून एका हाताने भन्नाट झेल घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाज चमकले
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. हिरव्या खेळपट्टीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. यश दयाल, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार आणि सुयश शर्मा या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. या सामन्यात गोलंदाजी करताना सुयश शर्मा आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर यश दयालने २, भूवनेश्वर कुमारने १ आणि रोमारीयो शेफर्डने १ गडी बाद केला.