PBKS vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपला कर्णधार फाफ डू प्लेसिसला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आगामी हंगामात या संघाला नवा कर्णधार मिळणार हे निश्चित होतं. काहींनी तर असंही म्हटलं होतं, की विराट कोहली पुन्हा कर्णधारपद स्वीकारू शकतो.
मात्र, हे सर्व अंदाज अचूक ठरले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रजत पाटीदारची कर्णधारपदी निवड केली. रजत पाटीदार ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकेल का? यावर शंका होती. मात्र, त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवताच त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रजत पाटीदारचा हा निर्णय पंजाब किंग्ज संघासाठी धोक्याची घंटा ठरला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला पंजाब किंग्ज संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १४.१ षटकात १०१ धावांवर आटोपला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सुयश शर्मा आणि जोश हेजलवूड यांनी दमदार गोलंदाजी केली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टने नाबाद ५६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने १२ धावा केल्या. शेवटी मयांक अगरवालने १९ धावांची खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
यासह रजत पाटीदारने, भारतीय कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याआधी रोहित शर्मा, एमएस धोनी, अनिल कुंबळे आणि हार्दिक पांड्याला हा कारनामा करता आला आहे. २००९ मध्ये अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवणारे कर्णधार
एमएस धोनी (चेन्नई) – २००७
अनिल कुंबळे (आरसीबी) –२००९
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) – २०१३
हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) –२०२२
रजत पाटीदार (आरसीबी) –२०२५