Rashid Khan Catch Video, GT vs SRH: गुजरात टायटन्स संघातील फिरकी गोलंदाज राशिद खान हा टी –२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. राशिद खान नेहमीच आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे चर्चेत असतो. अनेकदा फलंदाजी करताना तो मोठे फटके खेळून गोलंदाजांची झोप उडवतो. मात्र, गोलंदाजी आणि फलंदाजीसह तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. याचा एक नमुना त्याने हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सादर केला आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याने एक भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात हैदराबादला २२५ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी हेड आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात आली. या दोघांनी संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. ज्यावेळी हे दोघे तुफान फटकेबाजी करत होते, त्यावेळी गिलने गोलंदाजीची जबाबदारी प्रसिद्ध कृष्णाकडे सोपवली. पाचव्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने शॉर्ट चेंडू टाकला.
या चेंडूवर हेडने मिड विकेटच्या वरुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका फसला. कारण चेंडूला उंची मिळाली. पण चेंडू फार लांब जाऊ शकला नाही. त्यावेळी राशिद खान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. राशिदने मागच्या दिशेने धावत भन्नाट झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुजरातने ठेवले २२५ धावांचे आव्हान
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. गुजरातकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या शुबमन गिल आणि साई सुदर्शनने दमदार सुरूवात करून दिली. साई सुदर्शनने ४८ धावा केल्या. तर गिलने ७६ धावांची खेळी केली. शेवटी बटलरने ६४ धावा करत संघाची धावसंख्या २२४ वर पोहोचवली.
हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी २२५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादकडून हेड आणि अभिषेकच्या जोडीने सलामीला फलंदाजी करताना ४९ धावा जोडल्या. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादच्या एकही जोडीला भागीदारी करता आली नाही. अभिषेक शर्माने ७४ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादला २० षटकांअखेर १८६ धावा करता आल्या. हा सामना गुजरातने ३८ धावांनी आपल्या नावावर केला. यासह गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.