करोनामुळे तब्बल ५ महिने बंद असलेलं क्रिकेट ऑगस्ट महिन्यात पुन्हा सुरू झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कॅरेबियन बेटांवर संपूर्ण टी२० स्पर्धादेखील सुखरूप पार पडली. पण भारतीय क्रिकेट मात्र सुरू झालेलं नव्हतं. पण आता जगभरातील सर्वात लोकप्रिय अशा IPL स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. यंदाचे IPL इतर स्पर्धांपेक्षा वेगळं असणार आहे. याचं कारण यंदा IPLचा संपूर्ण हंगाम भारताबाहेर युएईमध्ये खेळला जाणार आहे. तसेच स्टेडियममध्येही प्रेक्षकांच्या जागी केवळ रिकाम्या खुर्च्या असणार आहेत. याच स्पर्धेबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टींग याने महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे.

रिकी पॉन्टींगने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटला नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला की IPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू कोण? त्यावर रिकी पॉन्टींग म्हणाला, “IPLमधील सर्वात धोकादायक क्रिकेटपटू म्हणजे मुंबई इंडियन्सचा हिटमॅन कर्णधार रोहित शर्मा. त्याला बाद करणं खूपच कठीण आहे. टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा खूपच चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL दोन्हीमधील कामगिरी अप्रतिम आहे. महत्त्वाचं म्हणजे तो सध्या चांगल्या लयीत आहे. अशा वेळी त्याला रोखणं खूपच आव्हानात्मक आहे.”

“मार्कस स्टॉयनीसची दिल्लीच्या संघातील फलंदाजीची जागा कोणती असावी यावर सध्या आमचा विचार सुरू आहे. मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना त्याने आपली लय आणि चमक बिग बॅश लीगमध्ये दाखवून दिली आहे. तसेच सराव सामन्यांमध्येही त्याने वरच्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. सलामीवीर म्हणून त्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. आमच्याकडे सध्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोन चांगले सलामीवीर आहेत. त्यामुळे आम्ही स्टॉयनीसला ३ ते ६ यापैकी कोणत्याही क्रमांकावर खेळायला पाठवू शकतो अशी सध्याची चर्चा आहे. तसेच शिमरॉन हेटमायर आणि अलेक्स कॅरी या दोघांपैकी एक जण फिनिशर म्हणून कामगिरी नक्कीच बजावू शकतो”, असेही पॉन्टींग दिल्ली कॅपिटल्स संघाबाबत बोलताना म्हणाला.