Virat Kohli’s fight with the umpire : आयपीएल २०२४ मधील ३६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली, पण या सामन्यात विराट कोहली आपली शानदार खेळी जास्त काळ चालू ठेवू शकला नाही. हर्षित राणाच्या एका चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहलीला अंपायरने आऊट दिले, यानंतर किंग कोहली अंपायरच्या निर्णयावर चांगला संतापला आणि त्याने अंपायरशी वाद घातला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली अंपायरवर का संतापला?

२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात जबरदस्त झाली. विराट येताच तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसला. त्याने अवघ्या ६ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने १८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या षटकांत चेंडू हर्षित राणाच्या हातात होता, त्याने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू कोहलीला फुल टॉस टाकला. विराटने तो सरळ बॅटने खेळला आणि चेंडू उंच गेला आणि हर्षित राणाने त्याचा झेल घेतला. यावर अंपायरने त्याला आऊट घोषित केले. त्यानंतर विराटने नो बॉल तपासण्यासाठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने दाखवलेल्या रिव्ह्यूमध्ये चेंडू कंबरेच्या वर असल्याचे दिसले, तरीही निर्णय विराटच्या विरोधात देण्यात आला. यानंतर कोहली चांगलाच संतापलेला दिसला, ज्यामुळे अंपायर आणि कोहली यांच्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले.

आरसीबीला २२३ धावांचे लक्ष्य –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अय्यरचे अर्धशतक आणि सॉल्ट-रमणदीप यांच्या वेगवान खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआर संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २२२ धावा केल्या. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

आरसीबीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –

यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाज पॉवरप्लेच्या षटकांतमध्ये चांगलेच महागडे ठरत आहेत. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ७५ धावा खर्च केल्या. या हंगामात आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ७०हून धावा खर्च करण्याची ही चौथी वेळ आहे. तसेच, आता आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने एकाच हंगामात ४ वेळा पॉवरप्लेमध्ये ७०हून धावा दिल्या आहेत.