Virat Kohli Musheer Khan Row: आयपीएलच्या क्वालिफायर वनचा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात पार पडला होता. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा अतिशय दारूण पराभव केला. पंजाबच्या एकामागोमाग एक विकेट पडत असताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून राखीव खेळाडू मुशीर खानला फलंदाजीसाठी उतरविण्यात आले होते. यावेळी मुशीर खानच्या मागे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या विराट कोहलीने केलेले हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले. विराट कोहली मुशीर खानला हिणवत असल्याचा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला. यावर आता माजी क्रिकेटपटूने मोठे विधान केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज अतुल वासन यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत बोलत असताना ते म्हणाले, क्रिकेटच्या मैदानावर अशा गोष्टी होत राहतात. तसेच विराट जर स्वतःच्या मुलांविरोधात क्रिकेट खेळत असेल तर त्याहीवेळेला तो असाच आक्रमक असेल, असेही वासन म्हणाले.

पंजाब किंग्जचे एकामागोमाग विकेट जात असताना नवव्या षटकात मुशीर खान फलंदाजीसाठी आला. तेव्हा पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने मुशीर खान थोड्यावेळापूर्वी पाणी देत होता, याचा हातवारे करत उल्लेख केला. याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात कोहली म्हणतो की, ये पानी पिलाता है.

कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यावर नेटिझन्स व्यक्त होत आहेत. अनेकांना कोहलीचे वर्तन आवडलेले नाही. एका नवख्या खेळाडूचा अवमान करत त्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका नेटिझन्स करत आहेत. तर कोहलीच्या चाहत्यांनी मात्र त्याला समर्थन दिले आहे.

विराट कोहलीच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, मुशीर खान इम्पॅक्ट सब म्हणून फलंदाजीला येण्याच्या काही मिनिटांपूर्वी वॉटर बॉय म्हणून वागत होता. त्यामुळे तो लगेच फलंदाजीसाठी आल्यामुळे विराटने गमतीत असा उल्लेख केला होता. मात्र मुशीर खान त्या सामन्यात वॉटर बॉय म्हणून आला होता का, याची पडताळणी झालेली नाही.

हा खेळाचा अविभाज्य भाग

माजी क्रिकेटपटू अतुल वासन म्हणाले की, खेळाच्या मैदानावर अशा गोष्टी खेळाचा अविभाज्य भाग असतात. विराटचा स्वभाव स्पर्धात्मक आहे. तो स्वतःच्या मुलांसह क्रिकट खेळला तरी तो जिंकायच्या भावनेनेच खेळेल. तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा स्वतःला प्रतिस्पर्ध्यापेक्षा जराही कमी समजू नका.

स्लेजिंग नेहमीच वाईट नसते

अतुल वासन पुढे म्हणाले की, स्लेजिंग हा खेळाचाच एक भाग आहे. जोपर्यंत त्याचा अतिरेक होत नाही, तोपर्यंत खेळाडूंना त्यांच्या भावना व्यक्त करू दिल्या पाहिजेत. जर कुणी चौकटीत राहून स्लेजिंग करत असेल तर ते वाईट नाही. स्लेजिंगमध्ये व्यंग, विनोद आणि वाईट वर्तणूक अशा भावनांचे मिश्रण असते.