Yuvraj Singh On Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने २८ एप्रिल (सोमवार) रोजी सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत आयपीएलमधील अनेक जुने विक्रम मोडले. वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूंत शतक केल्याने तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय भारतीय फलंदाज ठरला आहे. वैभवने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा (३७ चेंडूत शतक) विक्रम मोडला.
याचबरोबर १४ वर्षे आणि ३२ दिवसांचा सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासातील शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम मनीष पांडे (१९ वर्षे आणि २५३ दिवस) याच्या नावावर होता. वैभवच्या या खेळीने जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह चाहत्यांनाही थक्क केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.
सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि यूसूफ पठाणसारखे दिग्गज क्रिकेटपटूही राजस्थानच्या या युवा फलंदाजाच्या क्षमतेने प्रभावित झाले आहेत. त्यांनी वैभवचे खूप कौतुक केले आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम करणाऱ्या युसूफ पठाणनेही त्याचा विक्रम मोडल्याबद्दल वैभव सुर्यवंशीचे अभिनंदन केले आहे.
वैभवच्या खेळीचे कौतुक करताना युवराज सिंहने एक्सवर लिहिले की, “तुम्ही १४ वर्षांचे असताना काय करत होता? हा मुलगा डोळे मिचकावत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना तोंड देत आहे! वैभव सूर्यवंशी, नाव लक्षात ठेवा! तो निर्भय वृत्तीने खेळत आहे. पुढच्या पिढीला चमकताना पाहून अभिमान वाटतो!”
दरम्यान, युसूफ पठाणने देखील वैभव सूर्यवंशीचे करताना लिहिले की, “भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा माझा विक्रम मोडल्याबद्दल तरुण वैभव सूर्यवंशीचे खूप खूप अभिनंदन! राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ही कामगिरी केल्याचे पाहूण आणखी आनंद झाला. तरुणांसाठी या फ्रँचायझीमध्ये खरोखर काहीतरी जादू आहे. अजून खूप पुढे जायचे आहे, चॅम्पियन!”
तत्पूर्वी, सचिन तेंडुलकरनेही एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत वैभवच्या खेळीचे कौतुक केले आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “वैभवची खेळण्याची निडर पद्धत, फटका मारतानाचा बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखणं आणि चेंडूच्या मागे आपली संपूर्ण ताकद एकवटणं ही वैभवच्या या भन्नाट खेळीची रेसिपी होती. परिणाम… ३८ चेंडूंमध्ये १०१ धावा! मस्त खेळलास”, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरनं शेअर केली आहे.”