नागपूर : रणजी विजेते विदर्भ आणि शेष भारत यांच्यात बुधवारपासून सुरू झालेल्या इराणी चषक क्रिकेट लढतीचा पहिला दिवस डावखुऱ्या खेळाडूंनी गाजवला. सलामीवीर अथर्व तायडे (नाबाद ११८) आणि यश राठोड (९१) या डावखुऱ्या फलंदाजांच्या झुंजार खेळींमुळे विदर्भाने दिवसअखेर ५ बाद २८० धावांची मजल मारली. शेष भारताकडून डावखुरा फिरकीपटू मानव सुथार (३/६४) सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला.

जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरील या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरुवात अडखळती झाली. वेगवान गोलंदाज आकाश दीपने अमन मोखाडे (१९) याला, तर सुथारने ध्रुव शोरी (१८) आणि दानिश मालेवार (०) यांना झटपट माघारी धाडल्याने विदर्भाची ३ बाद ८० अशी स्थिती झाली.

गेल्या काही हंगामांत विदर्भाचा आधारस्तंभ म्हणून समोर आलेला करुण नायर आता कर्नाटकाकडे परतला आहे. त्यामुळे मधल्या फळीत विदर्भाची भिस्त प्रामुख्याने यश राठोडवर असून त्याने आपली जबाबदारी चोख बजावली. गेल्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या राठोडने नव्या हंगामाचीही दमदार सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याने दुलीप करंडक स्पर्धेत मध्य विभागाकडून खेळताना दक्षिण विभागाविरुद्ध १९४ धावा फटकावल्या होत्या. हीच लय कायम राखताना त्याने इराणी चषकासाठीच्या लढतीत १५३ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ९१ धावांची खेळी केली. त्याने आणि तायडेने चौथ्या गड्यासाठी १८४ धावांची भागीदारी रचली. दिवसातील अखेरच्या सत्रात सुथारने राठोडचा अडसर दूर केला. पाठोपाठ कर्णधार अक्षर वाडकरही (५) बाद झाला.

दुसऱ्या बाजूने तायडेने झुंजार फलंदाजी सुरू ठेवली आहे. तो २४० चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ११८ धावा करून नाबाद होता. या खेळीदरम्यान तायडेने ड्राइव्हचे काही नेत्रदीपक फटके मारले. दिवसअखेर तायडेच्या साथीने ‘नाइट वॉचमन’ यश ठाकूर (नाबाद ४) खेळपट्टीवर होता.

संक्षिप्त धावफलक विदर्भ (पहिला डाव) : ८४ षटकांत ५ बाद २८० (अथर्व तायडे नाबाद ११८, यश राठोड ९१, अमन मोखाडे १९; मानव सुथार ३/६४, आकाश दीप २/३५)