नागपूर : गोलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर रणजी विजेत्या विदर्भ संघाने शेष भारताविरुद्धच्या इराणी चषक क्रिकेट लढतीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाची दुसऱ्या डावात २ बाद ९६ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे एकूण २२४ धावांची आघाडी होती.
जामठा येथे सुरू असलेल्या या लढतीत विदर्भाच्या पहिल्या डावातील ३४२ धावांच्या प्रत्युत्तरात शेष भारताचा संघ २१४ धावांत गारद झाला. शुक्रवारी, लढतीच्या तिसऱ्या दिवशी ५ बाद १४२ धावांवरून पुढे खेळताना शेष भारताला आणखी केवळ ७२ धावांची भर घालता आली. कर्णधार रजत पाटीदारने (१२५ चेंडूंत ६६) एक बाजू लावून धरली, पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.
अखेरच्या चारपैकी एकही फलंदाज वैयक्तिक १५ धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. विदर्भाने पाच गोलंदाजांचा वापर केला आणि प्रत्येकाने किमान एक बळी मिळवला. त्यातही यश ठाकूर (४/६६) सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने वेगवान मारा करताना शेष भारताच्या तळाच्या चारपैकी तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे शेष भारताची धावसंख्या मर्यादित राहिली.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास आलेल्या विदर्भासाठी अमन मोखाडे (७६ चेंडूंत ३७) आणि अथर्व तायडे (४३ चेंडूंत १५) यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी १४.३ षटकांत ४२ धावांची भागीदारी रचली. पहिल्या डावातील शतकवीर तायडे दुसऱ्या डावात चमक दाखवू शकला नाही. त्याला डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने माघारी धाडले. मग वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने मोखाडेचा अडसर दूर केला. दिवसअखेर अनुभवी ध्रुव शोरी (६४ चेंडूंत नाबाद २४) आणि लयीत असलेला दानिश मालेवार (३७ चेंडूंत नाबाद १६) खेळपट्टीवर होता.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ (पहिला डाव) : ३४२
शेष भारत (पहिला डाव) : ६९.५ षटकांत सर्वबाद २१४ (रजत पाटीदार ६६, अभिमन्यू ईश्वरन ५२; यश ठाकूर ४/६६, पार्थ रेखाडे २/२४, हर्ष दुबे २/५८) विदर्भ (दुसरा डाव) : ३६ षटकांत २ बाद ९६ (अमन मोखाडे ३७, ध्रुव शोरी नाबाद २४; गुरनूर ब्रार १/११, मानव सुथार १/३५)