भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का म्हणून आख्ख्या क्रीडाविश्वात ठसा उमटवलेल्या जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वेगवान गोलंदाजीने सटीक यॉर्कर टाकून भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा बुमराह भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषक २०२३ मध्ये खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळं बुमराहला शस्त्रक्रीया करावी लागली होती. न्यूझीलंड दौऱ्यावर असताना बुमहराहला या दुखापतीला सामोरं जावं लागलं. दरम्यान, बुमराह दुखापतीवर मात करत असून तो लवकरच टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये सामील होईल, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. बुमराह विश्वचषक खेळणार असल्याचा विश्वास बीसीसीआयला असल्याचं समजते.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहच्या वर्ल्डकप २०२३ खेळण्याबाबत बीसीसीआयला आत्मविश्वास आहे. आयसीसीच्या या मोठ्या टूर्नामेंटमध्ये बुमराहचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येणार आहे. बुमराहला २०२२ मधील टी-२० वर्ल्डकपला पाठीच्या दुखापतीच्या समस्येमुळं मुकावं लागलं. श्रीलंकाविरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये जसप्रीत बुमराहचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
नक्की वाचा – IPL 2023: क्रीडाविश्वात खळबळ! ‘हा’ दिग्गज क्रिकेटर सट्टेबाजी प्रकरणामुळं अडचणीत?
परंतु, दुखापतीमुळं पुन्हा बुमराहला मालिकेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता आयपीएल मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल हंगामातही बुमराह खेळू शकला नाहीय. सप्टेंबर महिन्यात बुमराह दुखापतीवर मात करून टीम इंडियात परतेल, असं बोललं जात आहे. आयसीसी टूर्नामेंटमधील काही सामने तो खेळणार असून त्याद्वारे त्याची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे.