जेमिमा रॉड्रिग्जने दिमाखदार शतकी खेळी साकारत भारतीय संघाला वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. मुंबईकर जेमिमा या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरली. मात्र याच वर्ल्डकप स्पर्धेत जेमिमामा चक्क संघातून वगळण्यात आलं होतं. नेमकं कोणत्या कारणामुळे जेमिमाला वगळण्याची वेळ संघव्यवस्थापनावर का ओढवली होती ते समजून घेऊया.
वर्ल्डकपसाठी भारतीय संघव्यवस्थापनाने जास्तीज जास्त फलंदाज संघात असतील अशा पद्धतीने संघबांधणी केली. पहिल्या चार सामन्यात भारताने हेच डावपेच प्रमाण मानले. भारताकडे नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाज होते. पण बॉलिंगच्या बाबतीत पाचच पर्याय होते. फलंदाज भरपूर असल्यामुळे पॉवरप्ले तसंच मधल्या ओव्हर्समध्ये अधिकाअधिक धावा करण्याची संधी मिळत होती मात्र त्याचवेळी बॉलिंगमध्ये पर्याय मर्यादित असल्याने तिकडे मर्यादा येत होत्या. एखाद्या गोलंदाजांला प्रतिस्पर्ध्याने लक्ष्य केलं तर अन्य कुणाला गोलंदाजी द्यायची असा प्रश्न कर्णधारासमोर होता.
पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध भारताने विजय मिळवला. या दोन लढतीत भारतीय संघाला पाचवा तसं सहाव्या गोलंदाजांची उणीव भासली नाही पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला हा कच्चा दुवा आढळला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताने जेमिमाला वगळून रेणुका सिंगला संघात समाविष्ट केलं. अतिरिक्त गोलंदाज संघात असणं ही चांगली गोष्ट आहे. रेणुकाची इंग्लंडविरुद्धची कामगिरी चांगली झाली आहे.म्हणूनच अंतिम अकरात तिचा समावेश करण्यात आला आहे असं हरमनप्रीतने टॉसच्या वेळी बोलताना सांगितलं होतं. मात्र हा निर्णय भारतीय संघावर बूमरँग होऊन उलटला. भारतीय संघाचा या लढतीत ४ धावांनी निसटता पराभव झाला. जेमिमाला संघातून वगळण्याच्या मुद्यावरून संघव्यवस्थापनावर जोरदार टीका करण्यात आली.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २८८ धावांची मजल मारली. हिदर नाईटने १०९ धावांची शतकी खेळी साकारली. अॅमी जोन्सने ५६ धावा करत तिला चांगली साथ दिली. दीप्ती शर्माने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्मृती मानधनाने ८८ धावांची खेळी करत पायाभरणी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर (७०) आणि दीप्ती शर्मा (५०) यांनीही उत्तम भागीदारी साकारली. स्मृती बाद होताच भारतीय संघाची लय हरपली. भारतीय संघ सहज जिंकणार असं चित्र असताना घसरगुंडीमुळे ४ धावांनी पराभवाची वेळ ओढवली.
जेमिमाला वगळण्याचा निर्णय चुकल्याने भारतीय संघव्यवस्थापनाने बोध घेत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत जेमिमाला पुन्हा संघात समाविष्ट केलं. जेमिमाने नाबाद ७६ धावांची खेळी साकारत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ३४० धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावळ या दोघींनीही शतकी खेळी केल्या होत्या. न्यूझीलंडने २७१ धावांची मजल मारली. भारताने डकवर्थ लुईस आधारे ५३ धावांनी हा सामना जिंकला.
