विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि सामना फिक्सिंग करणाऱयांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुद्गल समितीने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे.
या खेळाडूचे नाव अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून हा खेळाडू आता भारतीय संघाचा भाग नाही. मात्र, या अहवालाविषयी १० नोव्हेंबर रोजी होणाऱया सुनावणीत हे नाव समोर येण्याची शक्यता आहे. विश्वचषक विजेत्या संघातील एका भारतीय खेळाडूचे बुकींशी संबंध असल्याचे मुद्गल समितीने अहवालात नमूद केल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुद्गल समितीची नेमणूक केली होती. या समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला. तीन वर्षांपूर्वी एका फसलेल्या ‘फिक्सिंग’चा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणात मुद्गल समितीला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेले आयपीएस अधिकारी बी.बी.मिश्रा यांनीही या खेळाडूला समन्स बजावले होते. तसेच या फिक्सिंगच्या फसलेल्या प्रयत्नांबाबत त्याची चौकशीही केली होती.याशिवाय बेटिंगप्रकरणात गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता बिंदू दारा सिंह यांच्यामधील संभाषणातील आवाजही त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाल्याने मयप्पन आणि त्यांचे सासरे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अहवालात खेळाडूंचा नावा ऐवजी क्रमांक देऊन उल्लेख-
दरम्यान, संबंधित अहवालाची गोपनीयता कायम राखण्यासाठी मुद्गल समितीने खेळाडूंचे नाव जाहीर करण्याऐवजी त्यांना विशिष्ट क्रमांक दिला आहे आणि यापुढे संबंधित न्यायाधीशांना खेळाडूंच्या नावा ऐवजी त्यांना दिलेल्या विशिष्ट क्रमांकांचीच यादी दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice mudgal report mentions bookie link of key player from indias world cup squad