संतोष जाधव
कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेला नवी मुंबई महापालिका प्रशासनाची नोटीस
महाराष्ट्राची अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेला पाच वर्षे क्रीडा अधिकारी पदाद्वारे दिलेल्या योगदानाबद्दल लेखी अहवाल देण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका प्रशासन विभागाने दिले आहेत. महापालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिलाषाला पदोन्नती मिळवून देण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याची चर्चा असतानाच प्रशासनाने तिला ही नोटीस बजावल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
विश्वचषक कबड्डी स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवणारी अभिलाषा ही नवी मुंबईची रहिवासी असल्याने तिच्या क्रीडानैपुण्याच्या बळावर तिला महापालिकेत सामावून घेण्यात आले. १ नोव्हेंबर २०१३ रोजी अभिलाषा नवी मुंबई महापालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून रुजू झाली. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीआधारे राज्य शासनाच्या नोकरीत सामावून घेतले जाते. मात्र, अशाप्रकारच्या नोकरीत राज्यभरात कोठेही नियुक्ती केली जाते. मात्र, अभिलाषाला थेट महापालिकेच्या नोकरीतच सामावून घेण्यात आल्याने तिच्या नियुक्तीवरून तेव्हाही प्रश्न उपस्थित झाले होते.
आता पाच वर्षांनंतर अभिलाषाला तिच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. नोकरीत सामावून घेताना संबंधित खेळाडूने ठरावीक दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. तेवढे दिवस संबंधित खेळाडूने कामाच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवणे बंधनकारक असते. अभिलाषालाही तशीच अट घालण्यात आली होती. मात्र, तिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण न केल्याने तिला ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्रीडा अधिकारी म्हणून अभिलाषाने शहरातील मुलांच्या क्रीडा विकासासाठी कार्यरत राहण्याची गरज आहे. पालिका त्यांना पगारासह, वाहन व्यवस्था, भत्ताही देते. आतापर्यंत ती खेळात सहभागी होती. परंतु आता ती प्रत्यक्षात कोणत्याही स्पर्धेत, देशपातळीवरील संघात सहभागी नसल्याने तिने मुलांसाठी, खेळासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर तिला प्रशासनाने पत्र दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अभिलाषाने पालिकेत उपायुक्तपदी बढती मिळावी, यासाठी प्रयत्न चालवल्याचेही समजते. यासाठी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रयत्न सुरू केले होते. काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेतर्फे अभिलाषाला शरद पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी अभिलाषाला उच्चपद का दिले जात नाही, याबाबत पवारांनी विचारणा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांनी नवी मुंबईचे नेते गणेश नाईक तसेच महापौर जयवंत सुतार यांना अभिलाषाला उपआयुक्तपद देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
नवी मुंबई महापालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून नोकरीत लागल्यानंतर देशाला विविध स्पर्धामधून पारितोषिके प्राप्त केली आहेत. खेळासाठी कामातील सवलतीबाबतचे पत्रही राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाले आहे. पालिकेच्या कबड्डी संघाच्या निवडीमध्येही मी सहभागी झाले आहे. पालिकेने दिलेल्या पत्राचा मी लेखी अहवाल तयार केला आहे.
– अभिलाषा म्हात्रे, नवी मुंबई महापालिकेची क्रीडा अधिकारी
नवी मुंबई महापालिका प्रशासन विभागाने अभिलाषा म्हात्रे यांच्याकडून क्रीडा अधिकारी पदावरील पालिकेतील योगदानाबाबतचा अहवाल मागितला आहे.
-नितीन काळे, उपायुक्त क्रीडा व सांस्कृतिक विभाग, नवी मुंबई महापालिका