दक्षिण कोरियाचा ३४-३२ असा विजय
अहमदाबादच्या द एरिना स्टेडियमवर जे घडले, त्यावर बराच वेळ कुणाचाच विश्वास बसत नव्हता. विश्वचषक कबड्डी स्पध्रेचा शंखनाद झाल्यानंतर तासाभरात देशभरातील कबड्डीविश्वात सन्नाटा पसरला होता. कारण कबड्डीचा जन्मदाता देश असे बिरुद मिरवणाऱ्या भारताला विश्वचषकात सलामीलाच पराभवाचा धक्का बसला होता. रोमहर्षक लढतीत दक्षिण कोरियाने भारतावर ३४-३२ असा दोन गुणांनी विजय मिळवला. परंतु यामुळे विश्वचषक स्पध्रेत आणखी रंगत पाहायला मिळू शकते, याची ग्वाही मात्र नक्की मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात इराणने अमेरिकेचा ५२-१५ असा धुव्वा उडवला.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारख्या दिग्गज संघांच्या अनुपस्थितीत कबड्डीच्या विश्वचषकात भारत आणि इराणला फारसे आव्हान नसेल, असेच म्हटले जात होते. मात्र पहिल्याच सामन्याने हे अंदाज चुकीचे ठरवले आहेत. पहिल्या सत्रात भारताकडे १८-१३ अशी आघाडीसुद्धा होती. मात्र दुसऱ्या सत्रात भारताच्या बचावात्मक धोरणामुळे अखेरच्या पाच मिनिटांत सामना हातातून निसटला.
यांग कुन लीची कुंडली आम्ही जाणतो, अशा शब्दांत भारताचे प्रशिक्षक बलवान सिंग यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला दावा केला होता. पहिल्या सत्रात भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याची तीनदा पकड केली. मात्र चार मिनिटे बाकी असताना भारतावर लोण पडला. त्यानंतर यांग कुन ली आणि डाँग जीऑन ली यांनी महत्त्वाचे गुण मिळवत कोरियाला सामना जिंकून दिला.
‘‘कोणताही संघ हरण्यासाठी मुळीच खेळत नाही. मात्र आता सर्वच संघांविरुद्ध सावध राहावे लागणार आहे. जास्त गुण जाऊ नयेत म्हणून अखेरीस आम्ही सावधपणे खेळलो,’’ असे मत भारताचा कर्णधार अनुप कुमारने (९ गुण) व्यक्त केले. कोरियाचा कर्णधार डाँग जू हाँग म्हणाला, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई समुद्रकिनारी स्पध्रेत भारत आमच्याच गटात होता. याशिवाय प्रो कबड्डीतील सामन्यांमुळे भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे हेरता आले.’’
आंतरराष्ट्रीय की जागतिक?.. मुख्यमंत्री अनभिज्ञ
गुजरात नगरीत होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री विजय रुपानी यांना स्पर्धा कोणती होते आहे, हेच स्पष्ट करता आले नाही. त्यामुळे आपल्या उद्घाटनीय भाषणात मुख्यमंत्र्यांनी चक्क दोनदा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असा उल्लेख केला. ‘‘सरदार वल्लभाई पटेल, महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमीत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. लवकरच ती ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवेल,’’ असा आशावाद रुपानी यांनी प्रकट केला.
शानदार उद्घाटन सोहळा
‘जग चढाईसाठी सज्ज’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेचा उद्घाटन सोहळासुद्धा तितक्याच शानदार पद्धतीने रंगला. यात सर्वप्रथम कबड्डीतील आव्हान प्रकट करणारे दिमाखदार नृत्य सादर करण्यात आले. पृथ्वीचा गोल म्हणजेच जगावर कबड्डीमधील सत्ता निर्माण करण्यासाठी आता लढाई सुरू होणार आहे, हाच आशय या नृत्यातून मांडण्यात आला होता. हे संपल्यानंतर गुजरातच्या संस्कृतीचा सुरेख मिलाफ करीत १२ देशांच्या कर्णधारांचे संचलन झाले. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत उपस्थित होते.
आजचे सामने
- वेळ : रात्री ६.५० वाजल्यापासून
- इंग्लंड वि. बांगलादेश, पोलंड वि. केनिया, भारत वि. ऑस्ट्रेलिया
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३
