भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा भाग नाही. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत तो पुनरागमन करेल. दुखापतीमुळे रोहितची सामन्याला मुकण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हापासून तो संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून तो २५ हून अधिक सामन्यांमधून बाहेर आहे. त्यामुळेच कपिल देव यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, रोहित शर्माच्या क्रिकेट कौशल्यात कोणतीही अडचण नाही. विराट कोहलीसह गेल्या दशकात तो भारतीय फलंदाजीचा एक आधारस्तंभ राहिला आहे. पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत त्याला गंभीर शंका असल्याचे कपिलने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता.

हेही वाचा – MCA Awards Function: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार

रोहित शर्माची गेल्या वर्षी भारताच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. तेव्हापासून भारताने एकूण ६८ सामने (५ कसोटी, २१ वनडे आणि ४२ टी-२०) खेळले आहेत. दुसरीकडे, रोहित केवळ ३९ सामने (२ कसोटी, ८ एकदिवसीय आणि २९ टी-२०) खेळू शकला आहे. टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयचे वर्कलोड मॅनेजमेंट हेही यामागचे सर्वात मोठे कारण आहे. पण दुखापतीमुळे रोहितलाही अनेक सामने मुकावे लागले आहेत. रोहित शर्माच्या फलंदाजीसोबतच फिटनेसही चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2023: के. श्रीकांत यांनी भारताच्या संभाव्य विश्वचषक संघातून ‘या’ दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

कपिल देव यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, ”रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे. पण त्याच्या फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे मला वैयक्तिक वाटते. तो पुरेसा फिट आहे का? कारण कर्णधार असा असावा की तो इतर खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित करू शकेल. संघसहकाऱ्यांना त्यांच्या कर्णधाराचा अभिमान असायला हवा.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev while attending on rohit sharmas fitness asked if he is fit for captaincy vbm