Karun Nair on Viral photo with KL Rahul: भारतीय संघाने हल्लीच झालेल्या इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. यासह इंग्लंडविरूद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. भारतीय संघाने ओव्हल येथील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेदरम्यान अनेक लक्षवेधी घटना घडल्या. त्यापैकी करूण नायरचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने पसरला होता. या व्हायरल फोटोमागचं करूणने सत्य सांगितलं आहे.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करुण नायर ड्रेसिंग रूममध्ये बसून रडत होता आणि केएल राहुल त्याचं सांत्वन करत होता. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरला होता. लॉर्ड्स कसोटीत करूणला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं तेव्हाचा हा फोटो होता.

करूण नायर इंग्लंड दौऱ्यावर खरंच रडत होता का?

करुण नायरने या व्हायरल फोटोवर आता वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला राहुलबरोबरच्या बाल्कनीतील फोटो एआय वापरून तयार करण्यात आल्याचे नायर म्हणाला. नायरने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मला वाटतं तो AI ने तयार केलेला फोटो होता. त्या फोटोमध्ये काही तथ्य नाहीये. हो, आम्ही नक्कीच बाल्कनीत बसलो होतो, पण त्यानंतर फोटोमध्ये जे दाखवलं तसं काहीच घडलं नाही.”

करूण नायरने सत्य सांगितल्याने सर्वच जण अवाक् झाले आहेत. सध्या एआयमुळे अनेक फोटो, व्हीडिओ होतात. त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्नदेखील समोर आहे. करुण नायर आठ वर्षांनी कसोटी संघात परतला. तो म्हणाला की, भारतीय संघात कर्नाटक संघातील त्याचे सहकारी राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासोबत वेळ घालवताना खूप बरं वाटलं.

नायर म्हणाला, ‘प्रसिद्ध आणि केएल राहुल त्या दौऱ्यावर असणं माझ्यासाठी चांगलं होतं. गेल्या दोन महिन्यांत आम्ही एकत्र फार चांगले क्षण घालवले. आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. आम्ही क्रिकेटबद्दल बोललो. संघात पुनरागमन करण्याव्यतिरिक्त, आम्ही इतर विषयांवर खूप बोललो. आमचा वेळ खूप छान गेला आणि मालिकेचा निकाल उत्तम लागला याचा मला आनंद आहे.

करूण नायरने अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात संघ संकटात असताना चांगली कामगिरी केली. करूणने पुनरागमनानंतर अखेरच्या कसोटीत पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याच्या या खेळीमुळे संघ पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारू शकला.