Karun Nair Fifty After 9 Years in Test Cricket: ‘क्रिकेट मला अजून एक संधी दे’ म्हणणाऱ्या करूण नायरला अखेरीस क्रिकेटने एक नाही दोन संधी दिल्या. करूण नायरने दुसऱ्या संधीचं सोनं करत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर करूण नायरने कसोटी अर्धशतकं झळकावलं. करूणने तब्बल ३१४७ दिवसांनंतर त्याचं कसोटी अर्धशतक झळकावलं आहे.

भारतीय संघाने ओव्हल कसोटीतही नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजीसाठी संघ उतरला. भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. संघाने सुरूवातीलाच दोन्ही सलामीवीरांचे विकेट गमावले. यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शनने भारताचा डाव सावरला. पण गिलने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या करूण नायरने एका टोकाने संघाचा डाव सावरला.

करूण नायरने साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याबरोबर भागीदारी रचल्या. करूणच्या समोर एकामागून एक विकेट्स पडत होते. पण करूणने एक टोक सांभाळून ठेवत धावांचा ओघ कायम ठेवला. करूण नायरने संधी मिळताच कमालीचे कव्हर ड्राईव्ह लगावत चौकारांनी धावा केल्या.

करूणचं कसोटीत इंग्लंडविरूद्धचं पुनरागमन

करूण नायरने ८९ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत अर्धशतक झळकावले. करूण नायरने ९ वर्षांनी पुनरागमन करत इंग्लंडविरूद्धचं अर्धशतक झळकावलं आहे. करूणने याआधी २०१६मध्ये इंग्लंडविरूद्ध त्रिशतक केलं होतं. यानंतर त्याने आता २०२५ मध्ये इंग्लंडविरूद्ध अर्धशतक केलंय.

करूण नायरने २०१७ नंतर २०२५ मध्ये कसोटीत पुनरागमन केलं आहे. करूणने गेल्या काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. त्याने शतकांची रांग लावत अनेक विक्रमही आपल्या नावे केले आणि याचाच परिणाम त्याला आयपीएल २०२५ मध्ये संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरूद्ध विस्फोटक खेळी करत पुनरागमनाचा डंका वाजवला.

डिसेंबर २०२२ मध्ये, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे’. यानंतर रोहित शर्मा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू म्हणून त्याला संधी दिली. पण पहिल्या तिन्ही कसोटीत तो फेल ठरला. यानंतर त्याला चौथ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आली. आता करूणची कारकीर्द पुन्हा इथेच संपणार असं वाटत असताना त्याला पाचव्या कसोटीत दुसरी संधी मिळाली, ज्याचं त्याने सोनं केलं.