Why KL Rahul Retired Hurt in IND A vs AUS A: भारत अ संघ वि. ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये अनऑफिशियल कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिला. तर दुसरा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया २००च्या आत बाद केलं. दरम्यान भारताचा सलामीवीर के एल राहुल बाद न होताच रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला आहे.

वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात केएल राहुलला स्थान देण्यात आलं आहे. राहुल यशस्वी जैस्वालसह सलामीला उतरणार आहे. पण यादरम्यान राहुल अचानक रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेल्याने सर्वच जण चिंतेत आले होते. पण यामागचं कारण आत समोर आलं आहे. त्यानंतर केएल राहुलचं कौतुक केलं जात आहे.

भारतीय अ संघाला विजयासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाने ४१२ धावांचं लक्ष्य दिलं आहे. तिसऱ्या डावाच्या अखेरीस भारताने दोन विकेट गमावून १६९ धावा केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान केएल राहुल फलंदाजी करतानाच अचानक मैदानाबाहेर गेला. राहुल तो चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि मोठी खेळी साकारणार असं चित्र असताना, तो रिटायर्ड हर्ट होत फिजिओबरोबर मैदानाबाहेर गेला.

केएल राहुल ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध सामन्यात का झाला रिटायर्ड हर्ट?

रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलला ताप आला होता, पण तरीही त्याने संघासाठी मैदानावर उतरत या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मैदानावर खेळत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. राहुलने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी ९२ चेंडूत ९ चौकारांसह ७४ धावांची खेळी केली होती.

घरच्या मैदानावर ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेपूर्वी केएल राहुलचा हा फॉर्म संघासाठी चांगली गोष्ट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमधील सामना आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या दिवशी २४३ धावा करायच्या आहेत, तर हातात आठ विकेट शिल्लक आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी आठ विकेट्स घ्यायच्या आहेत. पण केएल राहुल रिटायर्ड हर्ट झाला असून संघाला त्याची गरज भासल्यास तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. भारत अ संघाने जर हा अनऑफिशियल कसोटी सामना जिंकला तर ही दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने आपल्या नावे करतील.