टिटवाळ्याच्या महागणपतीच्या भूमीत महाराष्ट्राच्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात सबज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. मांडा विद्यामंदिराच्या पटांगणात टिटवाळा स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, मणिपूर, तामिळनाडू या संघांनी उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात स्थानिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात महाराष्ट्राने गोव्यावर अडीच मिनिटे राखून ३०-२८ अशी मात केली. आदर्श शिंदे (१ मिनिटे, ५ बळी) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. याचप्रमाणे देवांग उपासनी (१.१० मिनिटे आणि ३ गडी), कर्णधार प्रेम भांबिड (१.५० मि. आणि २ गडी), अमन सिंग (१ मिनिट आणि २ गडी) यांनी अप्रतिम खेळ केला. गोव्यातर्फे विनायक नाइकने ५ गडी बाद केले. याशिवाय रजत नाइक (१.३०, ५ गडी), निखिल कोंडाळकर (१ मिनिट, ४ गडी), मयुर कवळेकर (१ मिनिट, ३ गडी) छान खेळले.
दिल्लीने दादरा नगर हवेलीला ३४-२९ असे नमवले. सबज्युनियर गटात पहिल्यांदाच खेळणाऱ्या मणिपूरने कर्नाटकचा ३२-२० असा पराभव केला. चुरशीच्या मुकाबल्यात तामिळनाडूने आंध प्रदेशवर ३५-३४ असा एका गुणाने निसटता विजय मिळवला.
महाराष्ट्राचा मुकाबला मणिपूरशी होणार आहे तर दिल्लीचा मुकाबला तामिळनाडूशी होणार आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राची लढत दादरा नगर हवेलीशी तर मणिपूरसमोर तामिळनाडूचे आव्हान असणार आहे. महाराष्ट्राने मणिपूरवर २४-१८ असा एक डाव आणि ६ गुणांनी धुव्वा उडवला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र बाद फेरीत
टिटवाळ्याच्या महागणपतीच्या भूमीत महाराष्ट्राच्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात सबज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
First published on: 02-02-2014 at 06:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra langdi competition