अंतिम सामन्यांना निवड समितीऐवजी दोन्ही विभागांच्या फक्त एकेक सदस्याला निमंत्रण
कोणत्याही संघाची निवड ही त्यासाठी नेमलेली निवड समिती करते, हा तसा सर्वश्रुत नियम. ही समिती त्या स्पध्रेच्या प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीपर्यंतच्या खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन संघनिवड करते. मात्र महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने या प्रचलित परंपरेला झुगारत नवी शक्कल लढवली आहे. कराडला बुधवारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पध्रेच्या दोन्ही विभागांच्या अंतिम सामन्यांसह पुरुषांचा उपांत्य सामना पार पडला, मात्र हे महत्त्वाचे सामने आणि खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी निवड समितीचा प्रत्येकी एकेक सदस्य निमंत्रित करण्यात आला होता.
कराडला १ ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा राज्य संघटनेतर्फे आयोजित केली होती. याच स्पध्रेतील कामगिरीच्या आधारे तेलंगण येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पध्रेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ निश्चित करण्यात येणार होते. मात्र ४ डिसेंबरला पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही गटांचे विजेते ठरवणारे तीन महत्त्वाचे सामने होऊ शकले नाहीत. त्यानंतर २० डिसेंबरला हे तिन्ही सामने झाले. मुंबई उपनगरने पुण्याचे वर्चस्व झुगारत महिलांचे विजेतेपद पटकावले, तर पुण्याने कोल्हापूरला टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरवून पुरुषांच्या विजेतेपदावर नाव कोरले. कोल्हापूर-पुणे यांच्यातील उपांत्य सामनासुद्धा टायब्रेकपर्यंत चालला. मात्र या तिन्ही रंगतदार सामन्यांमधील थरार पाहण्यासाठी दोन्ही गटांचे सर्व निवड समिती सदस्य कराडमध्ये नव्हते.
राज्य कबड्डी असोसिएशनने राजेश पाडावे, संदेश जाधव आणि सचिन भोसले यांची पुरुष विभागासाठी तसेच सुहास जोशी, मनोज पाटील आणि विलास शिंदे यांची महिला विभागासाठी निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. मात्र बुधवारी झालेल्या अंतिम टप्प्यासाठी पुरुष विभागातील सचिन भोसले आणि महिला विभागातील विलास शिंदे हे निवड समितीचे सदस्य हजर होते.
याबाबत राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी सांगितले की, ‘‘राज्य अजिंक्यपद स्पध्रेतील झालेल्या सामन्यांनंतर खेळाडूंच्या कामगिरीआधारे दोन्ही संघ जवळपास निश्चित झाले होते. मग १५ डिसेंबरला दोन्ही निवड समित्यांशी सल्लामसलत करून त्याचा ढाचा निश्चित करण्यात आला. त्यानुसार बऱ्याचशा खेळाडूंना पूर्वतयारी शिबिराची पत्रेही देण्यात आली. त्यानंतर बुधवारी उर्वरित तीन सामन्यांनुसार दोन्ही संघांना त्यांच्या निवड समिती सदस्याने अंतिम स्वरूप दिले.’’
