Mithun Manhas : दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात आज (२८ सप्टेंबर) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मिथुन मन्हास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मिथुन मन्हास यांच्या या निवडीबाबत एक्सवर पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

जितेंद्र सिंह यांनी काय म्हटलं?

जितेंद्र सिंह म्हटलं की, “आनंद साजरा करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग! मिथुन मन्हास यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वात दुर्गम भागांपैकी एक असलेल्या डोडा या पूर्वीच्या जिल्ह्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. योगायोगाने जो माझा स्वतःचा गृह जिल्हा देखील आहे. काही तासांच्या अंतराने दोन बातम्या समोर आल्या आहेत. प्रथम, किश्तवारची मुलगी शीतल विश्वविजेती म्हणून चमकते आणि त्यानंतर लगेच मिथुन मन्हास यांची या प्रतिष्ठित पदावर निवड होते”, असं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मिथुन मन्हास यांचं नाव होतं आघाडीवर

दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांचं नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जात होतं. त्यानंतर अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिथुन मन्हास यांनी दिल्ली संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र त्यांना भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच मिथुन मन्हास यांच्याडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. जगातील सर्वात महागडा क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचं नेतृत्व करणारे ते पहिलेच अन्कॅप्ड भारतीय खेळाडू ठरू शकतात.

दरम्यान, मिथुन मन्हास यांच्याकडे क्रिकेट आणि प्रशासकीय असा दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. जम्मूमध्ये जन्मलेल्या मिथुन मन्हास यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशासकीय भूमिका पार पाडली आहे. यासह बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे.

दिल्लीला बनवलं रणजी चॅम्पियन

मिथुन मन्हास यांना १९९७-९८ मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे धाकड फलंदाज भारतीय संघाचा भाग होते. त्यामुळे मिथुन मन्हास यांना भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व केलं. यादरम्यान त्यांनी दिल्लीला २००७-०८ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली. यादरम्यान त्यांनी फलंदाजीत धावांचा पाऊस पाडत ५७.५६ च्या सरासरीने ९२१ धावा केल्या होत्या.