Mohammed Shami Comeback: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने वनडे संघात पुनरागमन केलं, पण कसोटी संघात त्याला अजूनही पुनरागमन करता आलेलं नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता शमीला पुनरागमन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी होम सीजनसाठी शमीचा बंगालच्या ५० संभावित खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शमी पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसू शकतो.
येत्या २८ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारतातील एकापेक्षा एक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत मोहम्मद शमी ईस्ट झोनकडून खेळताना दिसू शकतो. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं होतं. या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता.
या स्पर्धेत शमीने चांगली गोलंदाजी केली होती. स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये सर्वाधिक ९ गडी बाद करून तो भारतासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी होता. पण एक गोष्ट टाळता येणार नाही, तो या स्पर्धेतील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेत ५.६८ च्या इकॉनॉमिने धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे तो आधीसारखी गोलंदाज करत नसल्याचं दिसून आलं होतं.
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर मोहम्मद शमीला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं होतं. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बरेच महिने तो संघाबाहेर राहिला. त्यानंतर त्याला २०२५ मध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. बंगालच्या संघात मोहम्मद शमीसह आकाशदीप, मुकेश कुमार आणि अभिषेक पोरेल या खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडून शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.