Mohammed Siraj Fined By ICC: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये चांगलच वातावरण तापलं. सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या शेवटी हॅरी ब्रुकने फलंदाजी करताना वेळ वाया घालवला होता. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल हॅरी ब्रुक आमनेसामने आले होते. याचे पडसाद सामन्यातील चौथ्या दिवशी दिसले. बेन डकेटला बाद केल्यानंतर, मोहम्मद सिराजने आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. याचा फटका मोहम्मद सिराजला बसला आहे. आयसीसीने सिराजवर मोठी कारवाई केली आहे.
लॉर्ड्स कसोटीतील चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद करत माघारी धाडलं. बेन डकेटला बाद केल्यानंतर, मोहम्मद सिराज डकेटजवळ गेला आणि आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसून आला. यादरम्यान तो डकेटला काहीतरी म्हणाला. हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमाच्या विरोधात आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हा कोड ऑफ कंडक्ट लेव्हल १ मधील आर्टीकल २.५ चं उल्लंघन आहे. अशा प्रकारची कृती करणं,विकेट घेतल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन करणं हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे सिराजवर मॅच फीच्या १५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. यासह एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यात सिराजला दुसरा डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.
सिराजनेही आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. सिराजने या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्या डावात २ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावातही २ गडी बाद केले. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला १९२ धावा करता आल्या.
भारतीय संघ अडचणीत
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. चौथ्या दिवसाच्या शेवटी यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर करूण नायर १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल या डावात स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ६ धावा करता आल्या. आकाशदीप १ धाव करत माघारी परतला. त्यानंतर पाचव्या दिवशी ऋषभ पंत ९, केएल राहुल ३९, वॉशिंग्टन सुंदर ० आणि नितीश कुमार रेड्डी १३ धावा करत माघारी परतला.